Delhi Car Crash News: राजधानी दिल्लीत एका भयंकर अपघाताने खळबळ उडाली. एका भरधाव ऑडी कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले. शनिवारी मध्य रात्री १.४५ वाजता ही घटना घडली. नशेत धुंद असलेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. कारने चिरडलेले पाचही जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमीमध्ये एक आठ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्लीतील वसंत विहारमधील शिवा कॅम्प समोर हा अपघात घडला. रात्री पोलीस नियंत्रण कक्षात एक कॉल आला. त्या व्यक्तीने या अपघाताची माहिती दिली. वसंत विहार पोलिसांनी लगेच घटनास्थळी दाखल झाले.
चालक मद्यधुंद अवस्थेत
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, फूटपाथवर काही लोक त्यांच्या कुटुंबासोबत झोपलेले होते. त्याचवेळी एक पांढऱ्या रंगाची ऑडी कार प्रचंड वेगाने जात आली आणि तिने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले. या घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ झाला.
शिवा कॅम्पच्या समोर इंडियन ऑईलचा पेट्रोलपंप आहे, तिथेच ही घटना घडली. लाधी (वय ४०), त्यांची ८ वर्षांची मुलगी बिमला, पती साबामी उर्फ चिरमा (वय ४५), राम चंदर (वय ४५) आणि त्यांची पत्नी नारायणी (वय ३५) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. कारने चिरडलेले पाचही जण मूळचे राजस्थानमधील आहेत आणि सध्या दिल्लीमध्ये मोलमजुरी करतात.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
ऑडी चालवणारा आरोपी कोण?
पोलिसांनी ऑडी कार चालवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याचे नाव उत्सव शेखर (वय ४०) असे असून, तो द्वारका येथील रहिवाशी आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी तो नशेमध्ये होता. वैद्यकीय चाचणीतून हे समोर आले आहे की, तो दारू पिऊन कार चालवत होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जात होता, पण स्थानिक लोकांनी त्याला पकडले. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. अपघात झाला, त्यावेळी कारमध्ये आणखी कुणी होतं का? याचाही तपास पोलीस करत आहे.