नवी दिल्ली : भारतीय महिला हाॅकी संघाची स्ट्रायकर दीपिकाने एफआयएच प्रो लीग २०२४-२५ सत्रासाठी भुवनेश्वर येथे नेदरलँड्सविरुद्ध केलेल्या मैदानी गोलसाठी पाॅलिग्रास मॅजिक स्कील पुरस्कार जिंकला.
जगभरातील हॉकी चाहत्यांनी केलेल्या मतदानाच्याआधारे हॉकी प्रो लीगच्या २०२४-२५ हंगामासाठी पॉलिग्रास मॅजिक स्कील्स पुरस्काराचा विजेता ठरविण्यात आला. दीपिकाने हा गोल फेब्रुवारी २०२५मध्ये भुवनेश्वरच्या टप्प्यात केला होता. कलिंगा स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना निर्धारित वेळेत २-२ असा बरोबरीत होता, त्यानंतर भारताने नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. भारतीय संघ दोन गोलने पिछाडीवर असताना दीपिकाने ३५व्या मिनिटाला हा संस्मरणीय गोल केला.
‘हा पुरस्कार भारतीय हॉकीचा आहे’ दीपिका म्हणाली की, ‘हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला. नेदरलँड्ससारख्या आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध गोल करणे हा माझ्यासाठी खरोखरंच एक विशेष क्षण होता आणि आता हा सन्मान मिळणे माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. मी माझे सहकारी, प्रशिक्षक, कुटुंब आणि मित्रांचे आभार मानतो जे मला दररोज प्रोत्साहन देत राहतात. हा पुरस्कार फक्त माझा नाही तर भारतीय हाॅकीचा आहे. चला आपण सगळे मिळून पुढे जाऊ.’