सरकारच्या निर्बंधांमुळे कृषिमाल निर्यातीत घट; सप्टेंबरमध्ये ही निर्यात घटून १८ लाख टनांवर आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 10:57 IST2023-12-11T10:57:28+5:302023-12-11T10:57:58+5:30
अनियमित पावसामुळे यंदा शेती उत्पादनांचा मोठा फटका बसला आहे.

सरकारच्या निर्बंधांमुळे कृषिमाल निर्यातीत घट; सप्टेंबरमध्ये ही निर्यात घटून १८ लाख टनांवर आली
नवी दिल्ली : अनियमित पावसामुळे यंदा शेती उत्पादनांचा मोठा फटका बसला आहे. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने अनेक उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध लादले. यामुळे कृषी उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये ही निर्यात घटून १८ लाख टनांवर आली.
ऑगस्टमध्ये हेच प्रमाण २७.९४ लाख टन इतके होते. कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्नउत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपीडा) वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून हे चित्र समोर आले. पहिल्या सहामाहीत १७२.२७ लाख टनांचा कृषिमाल निर्यात केला.
कांदा निर्यातही कमी
तुकडा तांदूळ, बिगरबासमतीसह अन्य उत्पादनांवर अंकुश लावल्याने निर्यात सप्टेंबरमध्ये १७.९३ लाख टनांवर आली. ऑगस्ट २०२३-२४ मध्ये २७.९४ लाख टनांच्या कृषी उत्पादनांची निर्यात झाली. या मालाचे एकूण मूल्य १८,१२८ कोटी इतके होते. सप्टेंबरमध्ये ४.२५ लाख टन इतक्या बिगरबासमती तांदळाची निर्यात करण्यात आली. १.२१ लाख टन बासमती तांदूळ, १.५१ लाख टन कांदा आणि १,२१,४२७ टन म्हशींच्या मांसाची निर्यात करण्यात आली.