तिरुपती बालाजी मंदिरावर नो-फ्लाय झोन जाहीर करा; ‘टीटीडी’ची नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:47 IST2025-03-03T11:46:00+5:302025-03-03T11:47:34+5:30
२०१६ मध्ये आंध्र प्रदेश सरकारने केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाला अशीच विनंती केली होती.

तिरुपती बालाजी मंदिरावर नो-फ्लाय झोन जाहीर करा; ‘टीटीडी’ची नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे विनंती
हैदराबाद : तिरुमला येथील श्री बालाजी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिले असून, मंदिराच्या परिसरावर नो-फ्लाय झोन जाहीर करावा, अशी विनंती केली आहे.
‘टीटीडी’चे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आगम शास्त्राची तत्त्वे, मंदिराचे पावित्र्य, सुरक्षितता आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मंदिराचा परिसर नो-फ्लाय झोन म्हणून घोषित करावा.
या भागात वाढत्या हवाई वाहतुकीमुळे कमी उंचीवर उडणारी विमाने, विशेषत: हेलिकॉप्टर मंदिराच्या सभोवतालच्या शांत वातावरणात व पवित्र विधींमध्ये व्यत्यय आणू शकतात, अशी चिंता आहे. या उपाययोजनेमुळे भाविकांची शांतता आणि भक्ती बिघडवू शकणाऱ्या अशा मंदिरावरील कोणत्याही अनधिकृत हवाई हालचालींना प्रतिबंध होईल, असे पत्रात म्हटले आहे.
यापूर्वी केलेली विनंती फेटाळली होती कारण...
२०१६ मध्ये आंध्र प्रदेश सरकारने केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाला अशीच विनंती केली होती. तथापि, ती फेटाळण्यात आली होती. नो-फ्लाय झोनमुळे तिरुपती विमानतळापर्यंत पोहोचण्यावर मर्यादा येतील, असे कारण देण्यात आले होते.
या विनंतीला उत्तर देताना नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी तेव्हा म्हटले होते की, तिरुपती विमानतळाभोवतीच्या भूभागाच्या अडचणींमुळे विमानतळ आधीच एकाच धावपट्टीपुरते मर्यादित आहे आणि तिरुमला पर्वतीय भागात नो-फ्लाय झोनसारखा कोणताही अतिरिक्त निर्बंध घातल्यास या महत्त्वाच्या विमानतळापर्यंत पोहोचणे आणखी अवघड होईल.
आंध्र प्रदेशातील टीडीडी नेते के. राममोहन नायडू हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना ही नव्याने विनंती करण्यात आली आहे. राज्यात टीडीपीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आहे व टीडीपी हा केंद्रातील भाजपचा सहयोगी आहे.