मृत्यू काही मिनिटेच दूर होता; शेख हसिना यांच्या कटू आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:22 IST2025-01-19T08:22:11+5:302025-01-19T08:22:24+5:30
शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे.

मृत्यू काही मिनिटेच दूर होता; शेख हसिना यांच्या कटू आठवणी
नवी दिल्ली : आपले सरकार उलथविण्यात आल्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी मी आणि माझी छोटी बहीण शेख रेहाना यांनी बांग्लादेशातून पलायन केले तेव्हा मृत्यू आमच्यापासून अवघा काही मिनिटेच दूर होता, असे प्रतिपादन बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे.
शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली. हसिना यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही मृत्यूला अवघ्या २० ते २५ मिनिटांच्या अंतराने गुंगारा देऊन बचावलो. २१ ऑगस्टच्या (२००४) बॉम्ब हल्ल्यातून वाचणे किंवा ५ ऑगस्ट २०२४ च्या संकटातून वाचणे यामागे नक्कीच परमेश्वराची कृपा असली पाहिजे. अन्यथा मी वाचूच शकले नसते. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते.’
‘राजकीय विरोधकांनी ठार मारण्याचा कट रचला होता’, असे ७७ वर्षीय हसिना यांनी सांगितले. ५ ऑगस्ट २०२४ पासून त्या भारतात आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर माजलेल्या बंडाळीत हसिना यांचे १६ वर्षांपासून सत्तेवर असलेले बांग्लादेशातील सरकार उलथवून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढून भारतात आश्रय घेतला होता. ‘मी दु:खात आहे. मी माझ्या देशाबाहेर, माझ्या घराबाहेर आहे. सर्वकाही जाळण्यात आले आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.