कुलभूषणना पाकने सुनावली फाशी; भारतात संतापाची लाट
By Admin | Updated: April 11, 2017 04:49 IST2017-04-11T04:49:20+5:302017-04-11T04:49:20+5:30
हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने

कुलभूषणना पाकने सुनावली फाशी; भारतात संतापाची लाट
इस्लामाबाद : हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे.
कुलभूषण जाधव हे मुंबईच्या
पवई भागात राहणारे असून, त्यांचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही, असे भारताने तसेच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर भारताने आपल्या ताब्यात असलेले १२ पाकिस्तानी कैदी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या
वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात
मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २0१४ रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, कुलभूषण जाधववर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालविण्यात आले आणि त्यात दोषी ठरल्यामुळे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमाल जावेद बाजवा यांनी या शिक्षेवर सोमवारी शिक्कामोर्तब केले, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
कुलभूषण यांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा
जाधव यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे आणि न्यायालयातही गुन्हे कबूल केल्याचा दावा करून या पत्रकात म्हटले की, बलुचिस्तान आणि कराचीमधील अशांतता काबूत आणण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणून तेथे आणखी अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी व हेरगिरी करण्यासाठी ‘रॉ’ने आपल्याला पाठविल्याचे जाधव यांनी शपथेवर कबूल केले. याआधी पाकिस्तान लष्कराने जाधव यांच्या या कथित कबुलीजबाबाचा व्हिडिओही जारी केला होता.