डॉक्टरांच्या संप काळातील मृत्यूंची चौकशी होणार
By Admin | Updated: August 15, 2014 03:03 IST2014-08-15T03:02:46+5:302014-08-15T03:03:28+5:30
गेल्या महिन्यात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपकाळात २३४ जण हे डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मृत्युमुखी पडले नसल्याचा दावा राज्य शासनाने केला

डॉक्टरांच्या संप काळातील मृत्यूंची चौकशी होणार
मुंबई : गेल्या महिन्यात डॉक्टरांनी पुकारलेल्या संपकाळात २३४ जण हे डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने मृत्युमुखी पडले नसल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी या सर्वांच्या निधनाचे नेमके कारण काय होते हे शोधण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी एक समिती स्थापन केली़
या समितीमध्ये मंत्रालयातील सनदी अधिकारी, जिल्हाधिकारी, डॉक्टर व स्थानिक वरिष्ठ पोलीस असणार आहे़ यापैकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पीडितांच्या नातलगांचे जबाब नोंदवणार, डॉक्टर मृत्युमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रे तपासणार तसेच सनदी अधिकारी व जिल्हाधिकारी संबंधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले की नाही याची चौकशी करणार आहे़ या चौकशीची कागदपत्रे, पोलिसांनी नोंदवलेले जबाब व डॉक्टरांचा निष्कर्ष हे सर्व न्यायालयात सादर केले जाईल. याचा आढावा घेतल्यावर न्यायालय नुकसानभरपाई व फौजदारी चौकशीचे आदेश देईल़ या प्रकरणी अॅड़ गुणरत्न सदावर्ते यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली़ जुलैमध्ये डॉक्टरांच्या संपात रुग्णांचे बळी गेले. त्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई द्यावी व हे पैसे डॉक्टरांकडून वसूल करावेत तसेच या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत आहे़ (प्रतिनिधी)