जिवंत व्यक्तीला पाठविला मृत्यूच्या दाखल्याचा संदेश, दिल्ली महापालिकेचा अजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:34 IST2021-02-18T03:13:10+5:302021-02-18T06:34:38+5:30
Death certificate message sent to a living person : आया नगर येथील निवासी असलेले ५६ वर्षीय विनोद शर्मा निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्येही कोणाचा मृत्यू झालेला नाही.

जिवंत व्यक्तीला पाठविला मृत्यूच्या दाखल्याचा संदेश, दिल्ली महापालिकेचा अजब कारभार
नवी दिल्ली : ‘मृत्यूचा दाखला देण्यासंदर्भातील तुमचा अर्ज मंजूर झाला असून, खालील लिंकवर क्लिक करून दाखला डाऊनलोड करून घ्यावा’, असा संदेश दिल्लीतील आया नगर येथे राहणाऱ्या विनोद शर्मा यांच्या मोबाईलवर आला आणि त्यांच्या संतापाला पारावार उरला नाही. दक्षिण दिल्ली महापालिकेचा अजब कारभार या प्रकारामुळे उघडकीस आला आहे.
आया नगर येथील निवासी असलेले ५६ वर्षीय विनोद शर्मा निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्येही कोणाचा मृत्यू झालेला नाही. असे असताना त्यांच्या मोबाईलवर सकाळच्या प्रहरी वरीलप्रमाणे संदेश आला. या संदेशामुळे घरातल्या सगळ्यांचीच झोप उडाली. या प्रकारामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला, असे शर्मा सांगतात. त्यांनी याप्रकरणी स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार नोंदवली. त्यांनी तातडीने हा प्रकार महापौर आणि पालिका प्रशासनाच्या निदर्शानास आणून दिला. पालिका प्रशासनाने झाल्या प्रकाराबद्दल शर्मा यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. तसेच मोबाईल क्रमांक बदलून ज्यांनी मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता, त्यांच्याकडे तो पाठविण्यात आला. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी प्रशासनातर्फे घेतली जाईल, असे स्पष्ट केले.