खात्मा होण्यापूर्वी अबू दुजाना म्हणाला, अभिनंदन तुम्ही मला पकडलं पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 10:15 IST2017-08-03T08:25:09+5:302017-08-03T10:15:05+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी (1 ऑगस्ट ) सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा केला. चकमकीदरम्यान अबू दुजानाला जवानांनी घेराव घातल्यानंतर त्यानं लष्कराच्या जवानांना आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.

खात्मा होण्यापूर्वी अबू दुजाना म्हणाला, अभिनंदन तुम्ही मला पकडलं पण...
श्रीनगर, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी (1 ऑगस्ट ) सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा केला. अबू दुजानाचा खात्मा भारतीय लष्करासाठी मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, चकमकीवेळी जवानांनी अबू दुजानाला घेराव घातल्यानंतर त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यानं आत्मसमर्पण करण्यास नकार दिला होता.
''टाइम्स ऑफ इंडिया''नं दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराने एका काश्मीर नागरिकाच्या माध्यमातून मोबाइलद्वारे दुजानासोबत बातचित करण्याचा प्रयत्न केला. लष्कराचे जवान व दुजानामधील संभाषणाची ऑडिओ टेपमध्ये दुजाना अगदी शांततेनं संवाद साधताना ऐकायला मिळत आहे. जेव्हा काश्मिरी नागरिकाला त्यानं काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर त्या नागरिकानं फोन लष्कराच्या अधिका-यांकडे सोपवला. यावेळी दुजानानं अधिका-यांना विचारले, ''कसे आहात? मी विचारत आहेत कसे आहेत? यावर लष्करी अधिकारी म्हणाले की, ''आमची काळजी सोडू दुजाना तू आत्मसमर्पण का करत नाही. तुझे ज्या मुलीसोबत लग्न झाले आहे आणि तू तिला जी वागणूक देत आहेस ती योग्य नाही''
भारतीय लष्कराचे अधिकारी व दुजानामधील हे संभाषण एका टेपमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी लष्कराच्या अधिका-यांनी दुजानाला असेही सांगितले की, पाकिस्तानी एजन्सी तुझा वापर करत आहेत आणि तू निष्पाप काश्मिरींसाठी एक समस्या बनला आहेस. पण यानंतरही दुजानानं आपला उद्धटपणा कायम ठेवला.
दुजानानं यावेळी म्हटले की, आम्ही शहीद होण्यासाठी बाहेर पडलो, मी काय करू?. ज्यांना खेळ खेळायचा आहे त्यांनी खेळावं, कधी आम्ही पुढे तर कधी तुम्ही. आज तुम्ही मला पकडलं, अभिनंदन आहे तुमचं. ज्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं. असे सांगत त्यानं पुढे लष्कराच्या अधिका-यांना सांगितले की, मी आत्मसमर्पण करू शकत नाही. माझ्या नशिबी जे लिहिलं आहे तेच होणार. अल्लाह तेच करणार, ठीक आहे.
यावेळी भारतीय लष्कारातील अधिका-यांनी दुजानाला असेही सांगितले की, आपल्या आईवडिलांचा तरी विचार कर, मात्र याचाही त्यावर काहीही फरक पडला नाही. यावेळी अधिकारी त्याला असे आवाहन करत होते की, काश्मिरींना वाचव आणि त्यांचा दहशतवादासाठी वापर करू नकोस. मात्र यानंतर अचानक दुजानानं संवाद बंद केला. यानंतर दुजानाला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यासाठी आणखी एकदा शेवटचा प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याच्याकडून काहीही उत्तर आले नाही.