चव्हाणांच्या निवडीबद्दल दर्डा यांनी मानले सोनियांचे आभार
By Admin | Updated: March 5, 2015 02:25 IST2015-03-05T01:14:40+5:302015-03-05T02:25:00+5:30
खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.

चव्हाणांच्या निवडीबद्दल दर्डा यांनी मानले सोनियांचे आभार
नवी दिल्ली : खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. खा. विजय दर्डा यांनी बुधवारी येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली व चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी तसेच मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे आभार मानले.
राज्यातील पक्ष संघटनेमध्ये योग्य वेळी फेरबदल केला आहे व यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. काँग्रेस पक्ष कमजोर झाल्याकारणाने राज्यात एकापाठोपाठ एक अशा निवडणुकांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा खांदेपालट करण्याची नितांत आवश्यकता होती, असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ही जबाबदारी सांभाळण्यासाठी अशोक चव्हाण हे सर्वांत सक्षम व योग्य नेते आहेत. चव्हाण यांची निवड अगदी यथोचित आणि उपयुक्त अशीच आहे, असेही विजय दर्डा म्हणाले.
विजय दर्डा यांनी निरुपम यांच्या नियुक्तीचे तसेच नेत्यांच्या युवा चमूला पुढे आणण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले आहे. तथापि, महाराष्ट्राच्या राजधानीत काँग्रेसला एकजूट होऊन लढा देता यावा यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि अन्य नेत्यांचा या नव्या चमूत समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही विजय दर्डा यांनी केली आहे. (प्रतिनिधी)