कौतुकास्पद! १० वर्षांच्या मुलाचं धाडस; वडिलांना वाचवण्यासाठी थेट अस्वलाशी भिडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:34 IST2025-01-28T18:34:14+5:302025-01-28T18:34:34+5:30
एका १० वर्षांच्या मुलाने कमालीचं धाडस दाखवलं आहे.

कौतुकास्पद! १० वर्षांच्या मुलाचं धाडस; वडिलांना वाचवण्यासाठी थेट अस्वलाशी भिडला अन्...
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातून एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका १० वर्षांच्या मुलाने कमालीच धाडस दाखवलं आहे. दीपक असं या चिमुकल्याचं नाव असून त्याने आपल्या वडिलांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. वडिलांना वाचवण्यासाठी दीपकने थेट अस्वलाचा सामना केला.
वंजाराम नेताम हे आपला १० वर्षांचा मुलगा दीपकसोबत घनदाट जंगलाच्या मध्यभागी असलेला हांडावाडा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. तसेत ते दोघेही बांबू तोडण्यासाठी जंगलात आणखी थोडे आत गेले. मात्र त्याच दरम्यान अचानक एका जंगली अस्वलाने वंजाराम नेताम यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे वंजाराम जखमी झाले.
आपल्या वडिलांचा जीव धोक्यात असल्याचं पाहून, १० वर्षांच्या दीपकने लाकडी काठीच्या मदतीने अस्वलावर हल्ला केला. दीपकच्या धाडसामुळे आणि शौर्यामुळे, काही वेळानंतर अस्वल निघून गेला. मुलगा त्याच्या जखमी वडिलांना घेऊन गावी परतला आणि त्याला दंतेवाडा जिल्हा मुख्यालयात घेऊन आला. जखमी वंजारामवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वजण मुलाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.
असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून समोर आला. आठ वर्षांची एक निष्पाप मुलगी तिच्या आईसोबत झोपली होती. त्यानंतर आई बाथरुममध्ये गेली. तेव्हाच बिबट्याने मुलीवर हल्ला केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई धावत आली आणि बिबट्याचा सामना केला. महिला आणि बिबट्यामधील लढाई सुमारे ३ मिनिटे सुरू राहिली. शेवटी बिबट्या पळून गेला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी आणि नातेवाईक जमा झाले.