धोकादायक ‘निपाह’चा अलर्ट! केरळमध्ये शाळा-महाविद्यालये २४ सप्टेंबरपर्यंत बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 10:01 IST2023-09-17T10:01:03+5:302023-09-17T10:01:24+5:30
केरळमध्ये सहावा रुग्ण आढळला, कोझिकोड जिल्ह्याच्या बाहेर बाधितांच्या संपर्कात आलेले २९ लोक आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मलप्पूरममध्ये २२, वायनाड जिल्ह्यात एक व कन्नूर-त्रिशूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन बाधित आढळून आले.

धोकादायक ‘निपाह’चा अलर्ट! केरळमध्ये शाळा-महाविद्यालये २४ सप्टेंबरपर्यंत बंद
कोझिकोड : केरळच्या कोझिकोडमध्ये ‘निपाह’चा सहावा रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये, शिकवणी वर्ग २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळमधील सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था १४ सप्टेंबरपासूनच बंद आहेत. दुसरीकडे निपाह बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या १००८ झाली असून, यामध्ये ३२७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
कोझिकोड जिल्ह्याच्या बाहेर बाधितांच्या संपर्कात आलेले २९ लोक आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मलप्पूरममध्ये २२, वायनाड जिल्ह्यात एक व कन्नूर-त्रिशूर जिल्ह्यात प्रत्येकी तीन बाधित आढळून आले. ही संख्या आणखी वाढू शकते, असेही डाॅ. जॉर्ज म्हणाल्या. कोझिकोडमध्ये निपाह विषाणूमुळे ३० ऑगस्टला पहिला आणि ११ सप्टेंबर रोजी दुसरा मृत्यू झाला होता. ३० ऑगस्ट रोजी मृताच्या अंत्यविधीला १७ लोक उपस्थित होते. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
मृत्युदराचे प्रमाण कोरोनापेक्षा जास्त
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक राजीव बहल यांनी शुक्रवारी सांगितले की, निपाह विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. कोरोनाचा मृत्यूदर अवघा २-३ टक्के आहे. केरळमध्ये निपाह विषाणूच्या उद्रेकाचे कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, उच्च मृत्यू दर लक्षात घेता आयसीएमआरने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. केरळमधील लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचा, मास्क घालण्याचा आणि वटवाघळांच्या संपर्कात आलेल्या कच्च्या अन्नापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पहिल्यांदा संसर्ग कसा झाला, शोध सुरू
केरळमधील निपाह साथरोगाचा रुग्ण शून्य किंवा इंडेक्स केस (साथरोगाची पहिली नोंद झालेला रुग्ण) असलेल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर राज्य सरकारने शनिवारी संबंधिताला कुठे आणि कोणाकडून संसर्ग झाला, याचा शोध सुरू केला असून, त्यासाठी प्रशासनाने त्याच्या मोबाइल टॉवर लोकेशनची माहिती मागविली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, राज्य सरकार त्या माणसाला कुठे आणि कोणाद्वारे संसर्ग झाला हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, तर विषाणूचा भार तपासण्यासाठी केंद्रीय पथक वटवाघळांचे नमुने गोळा करीत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याने केलेल्या प्रयत्नांचे केंद्रीय पथकाने कौतुक केले, असा दावाही त्यांनी केला.
चार सक्रिय रुग्णांत ९ वर्षांच्या मुलाचा समावेश
आरोग्य विभागाने शुक्रवारी कोझिकोडमध्ये एका व्यक्तीला (३९) निपाह विषाणूची लागण झाल्याची पुष्टी केली. कोझिकोडमध्ये ‘निपाह’चे चार सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी एका ९ वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.