लोकसंख्या वाढवण्यासाठी दलितांनी जातीबाहेर लग्न करावे- जीतन राम मांझी
By Admin | Updated: August 23, 2014 09:18 IST2014-08-23T09:04:49+5:302014-08-23T09:18:48+5:30
आपली 'राजकीय ताकद' वाढवण्यासाठी दलित तरूणांनी जातीबाहेर लग्न करून लोकसंख्या वाढवावी, असा अजब सल्ला बिहारचे मुख्यमंत्री जीतान राम मांझी यांनी दिला आहे.

लोकसंख्या वाढवण्यासाठी दलितांनी जातीबाहेर लग्न करावे- जीतन राम मांझी
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २३ - आपली 'राजकीय ताकद ' वाढवण्यासाठी दलित तरूणांनी जातीबाहेर लग्न करून आपली लोकसंख्या वाढवावी, असा अजब सल्ला बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी दिला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
गुरूवारी पाटणा येथील एका समारंभातील भाषणादरम्यान मांझी यांनी हे वक्तव्य केले. ' जास्तीत जास्त दलित तरूणांनी आंतरजातीय लग्न करून आपली लोकसंख्या वाढवावी. आपली लोकसंख्या १५ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर गेल्यास आपली राजकीय ताकद वाढेल. आणि ज्या पक्षाला २२ टक्के मतं मिळतात, ते सत्तेवर येऊ शकतात, त्यामुळे माझ्या या सल्ल्यामागे राजकीय अर्थ आहे,' हे लक्षात घ्या असेही ते म्हणाले.
मांझी यांच्या या वक्तव्यावरून वातावरण चांगलेच तापले असून फक्त विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून नव्हे तर मांझी यांच्या स्वत:च्या जद(यू) पक्षातील अनेक नेतेही त्यांच्या विधानावर सवाल करत आहेत. मांझी यांचे हे वक्तव्य देशाच्या 'लोकसंख्या नियंत्रण पॉलिसीविरोधात' असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भाजप नेते सुशील मोदी यांनी मांझी यांच्यावर कठोर टीका केली आहे. 'एका राज्याच्या मुख्यमंत्री असे विधान कसे करू शकतात? आंतरजातीय विवाहाचे आम्ही स्वागतच करतो, पण त्याचा लोकसंख्या वाढवण्याशी काय संबंध. मांझी यांचे हे विधान लोकसंख्या नियोजन पॉलिसीविरोधात आहे,' असे ते म्हणाले. राजकीय फायद्यासाठी असलेले त्यांचे हे विधान दु्र्दैवी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.