'बाबा, केक आणा...' ICU मध्ये शेवटचा वाढदिवस साजरा केला अन् हसत-हसत जागाचा निरोप घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:14 IST2025-09-10T16:14:12+5:302025-09-10T16:14:43+5:30
हाडांच्या कर्करोगाशी झुंझ अपयशी ठरली..!

'बाबा, केक आणा...' ICU मध्ये शेवटचा वाढदिवस साजरा केला अन् हसत-हसत जागाचा निरोप घेतला
आयुष्याशी झुंजत असतानाही चेहरा आनंदीत ठेवणे सोपी गोष्ट नाही. पण २७ वर्षीय प्रियांका उर्फ पिहूने अतिशय कठीण परिस्थितीतही चेहऱ्यावरील हसू जाऊ दिले नाही. दुर्मिळ हाडांच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या प्रियांकाने २ सप्टेंबर रोजी शेवटचा श्वास घेतला. मात्र, शेवटच्या क्षणांपर्यंत आपले आयुष्य आनंदाने आणि उत्साहाने जगले. तिने फक्त स्वतःचे आयुष्यच आनंदाने जगले नाही, तर इतरांना जगण्याची आशा देऊन गेली.
हाडांच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या प्रियांकाचे २ सप्टेंबर रोजी निधन झाले. पण, जाण्यापूर्वी तिने आयसीयूमध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपला शेवटचा वाढदिवस साजरा केला. 'बाबा, एक केक आणा...मला माझे शेवटचे क्षण हसत-हसत साजरे करायचे आहेत', असे म्हणताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पण, प्रियांकाने सर्वांना धीर दिला. आयसीयूमध्ये पती लक्ष्यराज आणि कुटुंबीयांसोबत तिने शेवटचा केक कापला. हसत हसत तिने सर्वांना केक खाऊ घातला आणि म्हणाली की, मला रडत नाही, तर हसत-हसत या जगाचा निरोप घ्यायचा आहे.
प्रियंकाचे वडील नरपत सिंग सांगतात, जेव्हा जेव्हा मला पिहूची आठवण येते, तेव्हा तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. चार भावंडांमध्ये तिसरी असलेली प्रियांका कुटुंबातील सर्वात लाडकी होती. अभ्यासात हुशार असलेल्या प्रियंकाने बीबीए आणि सीएची परीक्षा वास केली होती. जानेवारी २०२३ मध्ये तिचे लग्न भटवास गावातील रहिवासी लक्ष्यराज सिंगशी झाले. लग्नानंतर काही काळाने प्रियांकाचा पाय दुखू लागला. सुरुवातीला सामान्य बाब समजून दुर्लक्ष केले, परंतु हळूहळू वेदना हाडांपर्यंत पोहोचल्या.
फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईत एमआरआय करण्यात आला, तेव्हा तिला इविंग सारकोमा नावाचा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असल्याचे आढळून आले. पहिली शस्त्रक्रिया मार्च २०२३ मध्ये झाली. दुसरी जून २०२४ मध्ये आणि तिसरी ऑगस्ट २०२४ मध्ये उदयपूरमध्ये झाली. सर्व प्रयत्न करूनही, आजार वाढतच राहिला. डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितले की, आता तिच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही.
प्रियांकाला माहित होते की, तिच्याकडे आता फार वेळ शिल्लक नाही. २५ ऑगस्ट रोजी जेव्हा सर्व नातेवाईक रुग्णालयात आले, तेव्हा तिने अचानक केक आणण्यास सांगितले. ती म्हणाली की, तिला शेवटचे क्षण संस्मरणीय बनवायचे आहेत. आयसीयूमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रियांकाने तिच्या हातांनी सर्वांना केक खाऊ घातला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी दुपारी तिची ढासळली अन् तिने जगाचा निरोप घेतला. प्रियंकाने सर्वांना रडवले, पण स्वतः मात्र हसत हसत निघून गेली. प्रियंकाने जाता जाता या जगाला कठीण काळातही आनंदाने जगण्याचे शिकवले...