आदिलाबाद-अकोला पॅसेंजरवर दरोडा
By Admin | Updated: August 18, 2014 02:46 IST2014-08-18T02:46:54+5:302014-08-18T02:46:54+5:30
दरोडेखोरांच्या टोळीने १६ आॅगस्टच्या मध्यरात्री आदिलाबाद-अकोला पॅसेंजरमध्ये धूमाकुळ घातला. दरोडेखोरांच्या मारहाणीत सुमारे २0 प्रवासी जखमी झाले. पाोलिसांनी अवघ्या काही तासांत चौघांना अटक केली.

आदिलाबाद-अकोला पॅसेंजरवर दरोडा
हिंगोली : दरोडेखोरांच्या टोळीने १६ आॅगस्टच्या मध्यरात्री आदिलाबाद-अकोला पॅसेंजरमध्ये धूमाकुळ घातला. दरोडेखोरांच्या मारहाणीत सुमारे २0 प्रवासी जखमी झाले. पाोलिसांनी अवघ्या काही तासांत चौघांना अटक केली.
पुरुष प्रवाशांवर चाकुने वार करत दरोडेखोरांनी महिलांकडील दागिने तसेच पुरूषांजवळील रोख रक्कम, मोबाईल व अंगठ्या अशा मौल्यवान वस्तू जबरीने काढून घेतल्या. पॅसेंजर गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची व्यवस्था नसते. त्यामुळे प्रवाशांना मदतीचा कोणताही पर्याय उपलब्ध झाला नाही. नांदापूर रेल्वेस्थानकाजवळ गाडीचा वेग कमी होताच दरोडेखोर गाडीखाली उड्या घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
आदिलाबादहून अकोल्याकडे जाणारी पॅसेंजर पूर्णा स्थानकावरून शनिवारी रात्री १०.१० वाजता सुटल्यानंतर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा स्थानकाजवळ २० ते २५ वर्षे वयोगटातील ६ तरुणांचे टोळके गाडीत शिरले होते. पाठीमागून तिसऱ्या डब्यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी हेरले. त्यांनी धारदार चाकू व कटरचा धाक दाखवत धूमाकुळ घातला. दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरूषाच्या हातावर, मांडीवर आणि पोटावर त्यांनी चाकुने वार केले. साखळी ओढून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या हातावरही त्यांनी वार केले. जखमी प्रवाशांना तातडीने हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)