तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:46 IST2025-10-31T15:42:48+5:302025-10-31T15:46:21+5:30
'मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे.

तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
'मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे. शेकडो कोटी रुपयांची पिके पाण्याखाली गेली आहेत. या वादळाचा सर्वात मोठा तडाखा तेलंगणाला बसला आहे. मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि संपूर्ण तेलंगणा राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्या वारंगल जिल्ह्यातच आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोंथाने घेतला १२ लोकांचा बळी
मोंथा चक्रीवादळामुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपत (३०), रमाक्का (८०), अनिल (३०), कृष्णमूर्ती (७०), नागेंद्र (५६), श्रीनिवास (६३), रजिथा (३५), सूरम्मा (७२), प्रणय (३०), कल्याण (२५), श्रव्य (१८) आणि सुरेश (३४) अशी मृतांची नावे आहेत. हणमकोंडा जिल्ह्यातील इनवेलु येथे आणखी एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. या भागात राहणारे प्रणय आणि कल्याण हे पती-पत्नी पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे जोडपे सिद्धिपेट जिल्ह्यातील अक्कनपेट येथे परतत असताना एका कल्व्हर्टवरून वाहणाऱ्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
रेल्वे रुळांवर पाणी साचले, वाहतूक विस्कळीत!
मोंथा चक्रीवादळामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे प्रशासन सतर्क झाले असून, सखल भागातील लोकांना बाहेर काढून मदत छावण्यांमध्ये हलवले आहे.
शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक उद्ध्वस्त!
आपत्ती निवारण पथके एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथके मदत कार्यात सतत गुंतलेली आहेत. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तेलंगणातील वारंगल, हनमकोंडा, सिद्दीपेट आणि इतर जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. मोंथा चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठे नुकसान होत आहे.