Cyclone Amphan : प. बंगाल, ओडिशाला ‘अॅम्फन’ चक्रीवादळाचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:12 IST2020-05-21T02:41:46+5:302020-05-21T07:12:21+5:30
पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हतिया बेटावर दुपारी अडीच वाजता थडकल्यानंतर ‘अॅम्फन’ चक्रीवादळ अधिक विक्राळ होत घरे भुईसापट करीत आणि झाडे, विजेचे खांब उखडत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने अग्रेसर झाले.

Cyclone Amphan : प. बंगाल, ओडिशाला ‘अॅम्फन’ चक्रीवादळाचा तडाखा
कोलकाता / भुवनेश्वर / नवी दिल्ली : ताशी १९० किलोमीटर वेगाने घोंगावणाऱ्या ‘अॅम्फन’ चक्रीवादळाचा बुधवारी पश्चिम बंगालला जबर तडाखा बसला. सुसाट वादळी वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यात दोन जण ठार झाले आहेत. पश्चिम बंगालसोबत ओडिशातील किनारपट्टीलगतच्या भागात जोरदार वा-यासोबत पाऊसही कोसळत आहे.
पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशातील हतिया बेटावर दुपारी अडीच वाजता थडकल्यानंतर ‘अॅम्फन’ चक्रीवादळ अधिक विक्राळ होत घरे भुईसापट करीत आणि झाडे, विजेचे खांब उखडत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने अग्रेसर झाले. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशेचा अंदाज लागल्याने चक्रीवादळ थडकण्याआधीच पश्चिम बंगाल आणि ओडिशातील किनारपट्टीलगतच्या ६ लाख ५८ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
हावडा आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मीनाखान भागात झाडे कोसळून दोन महिला ठार झाल्या.
एनडीआरएफची ४० पथके तैनात
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळाच्या वेगाने बदलत असलेल्या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मदत व बचाव कार्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची ४० पथके तैनात करण्यात आली आहेत. कोविड-१९ चा धोका ध्यानात घेऊनच एनडीआरएफला आत दुहेरी संकटाचा मुकाबला करायचा आहे.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी यावेळी सांगितले की, दक्षिण आणि उत्तर २४ परगणा व पूर्व मिदनापोर जिल्ह्यात ताशी १६० ते १७० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, वाºयाचा वेग ताशी १८५ वाढू शकतो. चक्रीवादळाचा विध्वंसक भाग किनारपट्टीवर थडकल्याने या तीन जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. चक्रीवादळाच्या केंद्राचा व्यास ३० किलोमीटर होता.
ओडिशातील पुरी, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपाडा, जाजपूर, गंजम, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यांतील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपले. जबर नुकसान करीत चक्रीवादळ बुधवारी रात्री उशिरापर्यंत ओडिशाला पार करीत पुढे अग्रेसर होईल.