सावधान! राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली मोठी फसवणूक; 'असा' होतोय रामभक्तांसोबत स्कॅम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:15 IST2024-01-22T17:05:39+5:302024-01-22T17:15:38+5:30
देवाच्या नावाखाली फसवणूक करण्याचा नवा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसादाच्या नावाखाली लोकांना आपल्या जाळ्यात अडकलं जात आहे.

सावधान! राम मंदिर प्रसादाच्या नावाखाली मोठी फसवणूक; 'असा' होतोय रामभक्तांसोबत स्कॅम
देशवासियांसाठी आजचा दिवस फार मोठा आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठपणा करण्यात आली आहे. याच दरम्यान देवाच्या नावाखाली फसवणूक करण्याचा नवा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसादाच्या नावाखाली लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं जात आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसादाची डिलिव्हरी देऊ असं सांगून बँक अकाऊंट रिकामं करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ठग सर्वप्रथम लोकांच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवतात. ज्यामध्ये अयोध्या राम मंदिराचा प्रसाद असलेल्या लाडूंची होम डिलिव्हरी करण्याचं आश्वासन दिलं आहे. लोक राम मंदिर प्रसाद या नावाच्या लिंकवर क्लिक करताच तिथे एक फॉर्म दिसेल.
फॉर्ममध्ये मोबाईल नंबर सोबत लोकांना त्यांचं नाव आणि पूर्ण पत्ता भरण्यास सांगितलं जातं. त्यानंतर, लोकांनी फॉर्ममध्ये सर्व तपशील भरून ते सबमिट करताच, संपूर्ण माहिती फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचते. त्यानंतर सायबर ठग कोणताही उशीर न करता नंबरवरून बँक अकाऊंटपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर काही सेकंदात सर्व पैसे काढून टाकतात.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता पोलीस सतत लोकांना सावध राहण्यास सांगतात, पण तरीही काही लोक या जाळ्यात अडकून फसवणूक करणाऱ्यांना पैसे देतात. एका पोलीस अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, ठग लोकांना त्यांचं काम करण्यासाठी फोनचा रिचार्ज करण्याचं आमिष दाखवत आहेत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांपर्यंत नंबर पोहोचतो आणि ते अकाऊंटमधून पैसे गायब होतात.