Cyber Crime: सोशल मीडियावर मुलींच्या नावाने फ्रॉड; सायबर गुन्हेगारांचे नवे कारनामे ऐकून उडेल झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:14 IST2025-12-11T16:14:04+5:302025-12-11T16:14:35+5:30
Cyber Crime: इंस्टाग्राम वापरकर्त्यांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा मध्य प्रदेशातील नीमच पोलिसांनी पर्दाफाश केला.

Cyber Crime: सोशल मीडियावर मुलींच्या नावाने फ्रॉड; सायबर गुन्हेगारांचे नवे कारनामे ऐकून उडेल झोप!
इंस्टाग्राम वापरकर्त्यांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा मध्य प्रदेशातील नीमच पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने केलेल्या ब्लॅकमेलमुळे मनसा पोलीस स्टेशन हद्दीतील बर्दिया जागरी येथील एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आले. मनसा पोलिस स्टेशन हद्दीतील मोहित पाटीदार नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहितने आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्युसाठी सायबर टोळीला जबाबदार धरले आहे.
नीमचचे एसपी अंकित जयस्वाल यांनी बुधवारी संध्याकाळी या सायबर टोळीचा पर्दाफाश करताना सांगितले की, घटनेच्या दिवशी टोळीतील दोन सदस्यांनी चक्क पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पीडित मोहितच्या घरी भेट दिली. त्यांनी निकिता नावाच्या मुलीच्या बनावट इंस्टाग्राम अकाउंट चॅटचा वापर करून मोहितकडून १० लाख रुपयांची मागणी केली. या भीतीमुळे मृताने आत्महत्या केली.
दोन जणांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली आहे. पंकज धनगर (वय २८, रा. भातखेडी) आणि कैलाश रेगर (वय ४५, रा. भातखेडी) अशी त्यांची आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक मारुती सुझुकी कार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड
पोलीस चौकशीत आरोपींनी कबूल केले की, पंकजने मुलींच्या नावांचा वापर करून तीन ते चार बनावट इंस्टाग्राम आयडी तयार केले. या आयडीच्या माध्यमातून तो तरुण इंस्टाग्राम वापरकर्त्यांशी अश्लील चॅट करत होता आणि नंतर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पीडितांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता. तसेच त्यांच्याकडून पैसे उकळत होता.
पीडितांना पुढे येण्याचे आवाहन
पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी नीमच, मंदसौर आणि रतलाममध्ये अशाच प्रकारच्या घटनांची कबुली दिली. इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. नीमच पोलिसांनी या टोळीने अडकवलेल्या इतर तरुणांना कोणत्याही भीतीशिवाय पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जर अशी घटना कोणासोबत घडली असेल तर ताबडतोब मनसा पोलिस स्टेशन किंवा नीमच सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले.