९ वर्षांच्या मुलावर 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याचा गुन्हा
By Admin | Updated: August 8, 2014 14:24 IST2014-08-08T09:27:37+5:302014-08-08T14:24:51+5:30
कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणा-या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

९ वर्षांच्या मुलावर 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याचा गुन्हा
ऑनलाइन टीम
आग्रा, दि. ८ - राज्यात कायद्याचे व सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळे टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणा-या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलिसांनी ही कारवाई केली असून त्या मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. अखेर नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतल्यावर त्या मुलाला गुरूवारी जामीनावर सोडण्यात आले.
हे प्रकरण आहे १८ जुलैचे. कुर्रा गावातील या मुलाच्या कुटुंबियांनी पाळलेली गुरं-ढोरं दुस-या गावक-याच्या शेतात घुसली आणि त्यांनी पिकांचे नुकसान केले. या घटनेनंतर त्या मुलाची दुस-या मुलाशी बाचाबाची झाली ज्याचे रुपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. ५ ऑगस्ट रोजी पोलिस त्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी वडिलांसह त्या मुलाला ताब्यात घेतले. त्यांचे काहीही ऐकून न घेता तपोलिसांनी त्यांच्यावर कलम १०७/११६ अंतर्गत कायदा व सुव्यवस्थआ बिघडवण्याचा गुन्हा दाखल केला.
मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळले असून त्या मुलाला ताब्यात घेतल्याचे नाकारले, तसेच आपण फक्त त्या मुलाच्या वडिलांची काही तास चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.