कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. रिसोडा गावातील ३० वर्षीय रीना देवी नावाच्या या महिलेने कौटुंबिक कलहामुळे कंटाळून मुलांसह केन कालव्यामध्ये उडी मारली आणि जीवन संपवलं. दरम्यान, या चौघांचेही मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रीनाचा पती अखिलेश हा मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करत असे. तसेच चार पैसे अधिक कमावण्यासाठी तो शहरामध्येही जाऊन काम करत असे. मात्र गेल्या काही काळापासून तो व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलांपासून दुरावला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडली तरी तो कुटुंबाकडे लक्ष देत नव्हता. रीना ही पतीला मुलांसाठी आवश्यक वस्तू आणि घरात किराणा आणायला सांगायची. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्यावरून घरात रोज वादविवाद व्हायचे.
अखेरीस सततच्या वादांना कंटाळून रीना हिनं धक्कादायक पाऊल उचललं. तिने हिमांशू (९), अंशी (५) आणि प्रिंस (३) यांना घेऊन घराबाहेर पडली. तिने तिच्याकडील काही वस्तू किनाऱ्यावर ठेवल्या. त्यानंतर तिने एका कपड्याने मुलांना स्वत:च्या शरीराला घट्ट बांधले बांधले आणि कालव्यात उडी मारली.
या महिलेच्या पतीने पत्नी आणि मुले घरात नसल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान, कालव्याच्या किनाऱ्यावर महिलेचं साहित्य मिळाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी केला आणि स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने महिला आणि इतर तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले.