पत्नी आणि ३ मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली सुमारे २३ वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर एका व्यक्तीची अलाहाबाद उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ आणि न्यायमूर्ती जयकृष्ण उपाध्याय यांच्या खंडपीठाने सरकारी पक्ष आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे सांगितले. तसेच हा खटला म्हणजे न्याप्रणालीवरील दु:खद टिप्पणी असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुमारे २३ वर्षांपूर्वी २००३ मध्ये रईस नावाच्या या इसमावर त्याने पत्नी आणि ३ मुलांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. २९-३० ऑगस्टच्या रात्री कौटुंबिक वादामधून रईस याने कथितपणे चाकूने वार करून पत्नी आणि मुलांची हत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी मृत महिलेच्या काकांनी तक्रार दिली होती. तसेच या प्रकरणी खटला चालल्यानंतर कोर्टाने आरोपीला चार हत्यांप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी रईस याच्या बचावलेल्या ५ वर्षांच्या मुलाने कोर्टात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली होती.
ही घटना घडली तेव्हा रईस याचा मुलगा अझीम हा घरात होता. तसेच त्याने वडिलांनीच हत्या केल्याचे सांगितले होते. त्या आधारावर कोर्टाने वडिलांना दोषी ठरवले होते. मात्र या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा आता २८ वर्षांच्या झालेल्या अझीम याने आपकी साक्ष फिरवली. आपण तक्रारदार आणि सरकारी वकिलांच्या सांगण्यावरून खोटी साक्ष दिल्याचे सांगितले. तसेच मी तेव्हा त्यांचं ऐकलं नसतं तर मला घरातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती, अशी कबुली दिली. न्यायालयाने या जबाबाची गांभीर्याने दखल घेतली आणि पत्नी व मुलांच्या हत्ये प्रकरणी तब्बल २३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या रईस याची मुक्तता केली.
हा निकाल देताना कोर्टाच्या खंडपीठाने सांगितले की, तक्रारदार आणि आरोपीमध्ये जमिनीवरून वाद होता. त्यामुळे तक्रारदाराच्या हेतूबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच शवविच्छेदनामध्ये कुठल्यातरी धारदार हत्याराने वार केल्याचा उल्लेख आहे. मात्र सरकारी पक्षाने साध्या चाकूने वार केल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपीविरोधात सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद कमकुवत दिसत आहे, असेही कोर्टाने नमूद केले.
मात्र हा गुन्हा अत्यंत गंभीर असला तरी हा गुन्हा तक्रारदारानेच केला असावा या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत संशयाचा फायदा देत आरोपी रईस याला मुक्त करण्यात येत आहे. तसेच त्याच्यावर अन्य कुठला आरोप नसेल तर त्याला तुरुंगातून तत्काळ सोडण्यात यावे, असेही कोर्टाने निकाल देताना सांगितले.
Web Summary : After 23 years, Allahabad HC acquitted a man wrongly convicted of murdering his family. Key evidence was recanted testimony from his son, who admitted to lying under pressure. Land dispute suspicions and flawed evidence led to his release.
Web Summary : इलाहाबाद उच्च न्यायालय ने 23 साल बाद एक व्यक्ति को परिवार की हत्या के झूठे आरोप से बरी कर दिया। बेटे ने दबाव में झूठी गवाही दी, जिसके बाद जमीन विवाद और कमजोर सबूतों के चलते रिहाई हुई।