CoronaVirus News: देशात कोरोनाची चौथी लाट येणार? कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता वाढली; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 17:47 IST2022-04-24T17:44:55+5:302022-04-24T17:47:37+5:30
ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना लसीचं कवच भेदण्यात यशस्वी; आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी सांगितला पुढचा धोका

CoronaVirus News: देशात कोरोनाची चौथी लाट येणार? कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता वाढली; पण...
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चौथ्या लाटेची भीती वाढली आहे. सध्या वापरात असलेल्या बहुतांश लसी ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधात पुरेशा प्रभावी नसल्याचं संशोधनातून आढळून आलं आहे.
कोविशील्ड, कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांच्या शरीरात कोरोना विषाणूचा मुकाबला करणाऱ्या अँटिबॉडीज तयार होतात. मात्र सहा महिन्यांत अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ओमायक्रॉनच्या BA.2 व्हेरिएंटचा धोका वाढतो. त्यामुळे कोविशील्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांना लवकरच बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या (ICMR) शास्त्रज्ञानं बूस्टर डोसची गरज अधोरेखित केली आहे. बूस्टर डोस घेतला तरच कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून बचाव करता येईल, असं शास्त्रज्ञानं सांगितलं.
आयसीएमआरमधील तज्ज्ञांनी कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसींची चाचणी केली. लस घेण्यास पात्र असलेल्या लोकांना लगेचच बूस्टर डोस देण्यात यावेत, असं तज्ज्ञांनी सांगितलं. कोविशील्ड, कोवॅक्सिनचे डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीजचं प्रमाण ६ महिन्यांनंतर घसरतं. त्यामुळे बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितलं.
कोविशील्डचा डोस घेतलेल्यांचं शरीरातील अँटिबॉडी ओमायक्रॉनपुढे निष्प्रभ ठरल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागात ओमायक्रॉन जास्त वेगानं पसरतो, अशी माहिती आयसीएमआरच्या शास्त्रज्ञानं दिली.