...तरीही तुम्हाला होऊ शकतो कोरोना; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती, डॉक्टर चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 15:47 IST2021-08-02T15:46:42+5:302021-08-02T15:47:00+5:30
CoronaVirus News: वैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधनातून समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

...तरीही तुम्हाला होऊ शकतो कोरोना; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती, डॉक्टर चक्रावले
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू असताना जगभरात कोरोनाबद्दल संशोधनं सुरू आहेत. अमृतसरमधील एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयानं केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांच्या अश्रूंमधूनही कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो, असं संशोधन सांगतं. या संशोधनात १२० रुग्णांचा समावेश होता. पण कोरोनाचा सर्वाधिक प्रसार हा रुग्णांच्या श्वासाच्या माध्यमातून होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, १२० रुग्णांचा अभ्यास करून संशोधन करण्यात आलं. यातील ६० रुग्णांच्या बाबतीत अश्रूंच्या माध्यमातून विषाणू शरीराच्या दुसऱ्या भागात पोहोचला होता. तर ६० जणांच्या बाबतीत असं घडलं नाही. संशोधकांना ४१ रुग्णांमध्ये कंजेक्टिवल हायपरमिया, ३८ रुग्णांमध्ये फॉलिक्युलर रिऍक्शन, ३५ रुग्णांमध्ये केमोसिस, २० रुग्णांमध्ये म्युकॉईड डिस्चार्ज आणि ११ जणांमध्ये खाज आढळून आली. ऑक्युलर लक्षणं आढळून आलेल्या ३७ टक्के रुग्णांमध्ये मध्यम स्वरुपाचं कोरोना संक्रमण होतं. तर इतर ६३ टक्के रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं होती. संशोधनानुसार १७.५ टक्के रुग्णांच्या अश्रूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली.
याच महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट?
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल हैदराबाद आणि कानपूरमधील आयआयटीनं संशोधन केलं. आयआयटी हैदराबादनं मथुकुमल्ली विद्यासागर, तर आयआयटी कानपूरनं मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या संशोधनात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येईल. यादरम्यान दररोज १ लाख नवे कोरोना रुग्ण आढळून येतील. परिस्थिती अतिशय बिघडल्यास हा आकडा दीड लाखांपर्यंत जाईल, असं आयआयटीचं संशोधन सांगतं.
केरळ आणि महाराष्ट्रामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर होऊ शकते, असा अंदाज विद्यासागर यांनी वर्तवला आहे. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल, असंदेखील त्यांनी सांगितलं. कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत जाईल, असं आयआयटीचा अहवाल सांगतो. गणिती प्रारुपाच्या मदतीनं आयआयटीनं हा अंदाज बांधला आहे.