दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:35 IST2025-12-11T17:34:43+5:302025-12-11T17:35:38+5:30
Umar Khalid Interim Bail: जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही निर्देशही दिले आहेत.

दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
नवी दिल्ली: मागील पाच वर्षांपासून तुरुंगात कैद असलेल्या दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बहिणीच्या लग्नासाठी हा 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत उमर अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर असेल. जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, उमरला 29 डिसेंबरच्या संध्याकाळी आत्मसमर्पण करावे लागेल.
गेल्या वर्षी 7 दिवसांचा जामीन मिळालेला
दरम्यान, जामीन मंजूर करताना न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, जामीन काळात उमर खालिद सोशल मीडियाचा वापर करू शकणार नाही. तसेच, या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदारांशी संपर्क साधू शकणार नाही. यापूर्वी, उमर खालिदला डिसेंबर 2024 मध्येही चुलत भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 7 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.
उमर खालिदवर काय आरोप?
फेब्रुवारी 2020 मध्ये CAA आणि NRC विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार झाला होता. तर, सप्टेंबर 2020 मध्ये दिल्ली पोलिसांनी उमर खालिदला अटक केली होती. दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात UAPA (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालिदसह, शरजील इमाम आणि इतर अनेकांवरही याच प्रकरणात कट रचल्याचा आरोप आहे.