भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:34 IST2025-09-05T10:33:31+5:302025-09-05T10:34:35+5:30
बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर २५.८ असून, अंदमान-निकोबारमध्ये सर्वांत कमी १०.१. जन्मदर आहे.

भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
नवी दिल्ली - गेल्या पाच दशकांत देशभरात जन्मदरात मोठी घट झाली आहे. १९७१ मध्ये देशाचा जन्मदर ३६.९ होता. तो २०२३ मध्ये १८.४ झाला आहे. महाराष्ट्रात ह घट अधिक तीव्र आहे. देशाच्या ग्रामीण भागात २०१३ मधील २२.९ वरून २०२३ मध्ये २०.३ तर शहरी भागात २०१३ मधील १७.३ वरून २०२३ मध्ये १४.९ जन्मदर झाला आहे.
बिहारमध्ये सर्वाधिक जन्मदर २५.८ असून, अंदमान-निकोबारमध्ये सर्वांत कमी १०.१. जन्मदर आहे. महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षांत जन्मदर तब्बल २.३ अंकांनी घसरला आहे.
मृत्यूदर काय आहे?
चंदीगडमध्ये सर्वांत कमी ४ आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक ८.३ मृत्यूदर नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर ६.१ आहे. (स्रोत : केंद्राचा एसआरएस अहवाल)
बालमृत्यू दर नीचांकी पातळीवर
केंद्र, राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य योजना, जनजागृती व कुटुंब नियोजनाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतातील बालमृत्यू दर २५ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. २०१३ मध्ये हा दर ४० होता. म्हणजे गेल्या दहा वर्षांत यात ३७.५ टक्क्यांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील बालमृत्यूदर फक्त १४वर आला आहे.
बालमृत्यू सर्वाधिक कुठे?
१९७१ मध्ये देशातील बालमृत्यूदर १२९ होता, जो २०२३ मध्ये फक्त २५ झाला. म्हणजे यात ८०% घट झाली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेशमध्ये बालमृत्यू दर सर्वाधिक ३७ आहे. मणिपूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३ इतका दर. केरळ हे एकमेव मोठे राज्य आहे जिथे एक-अंकी दर नोंदविण्यात आला आहे.