बांगलादेशात सत्तापालट, पंतप्रधानांनी देश सोडला, बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला; सुरक्षा वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:21 IST2024-08-05T16:17:54+5:302024-08-05T16:21:37+5:30
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला आहे.

बांगलादेशात सत्तापालट, पंतप्रधानांनी देश सोडला, बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला; सुरक्षा वाढवली
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत. काल एका दिवसात निदर्शनात १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज परिस्थिती बिघडल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असून देशही सोडल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. याबाबत बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत.
बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा ४,०९६ किलोमीटर लांब आहे. बीएसएफने सर्व सीमेवर अलर्ट जारी केला आहे. बांगलादेशात गेल्या महिनाभराहून अधिक काळ निदर्शने सुरू आहेत.
In the view of law and order situation in Bangladesh, BSF issues high alert along the India-Bangladesh border. BSF DG has also reached Kolkata, said a senior BSF officer. pic.twitter.com/Ry0hj8rmGj
— ANI (@ANI) August 5, 2024
पंतप्रधान यांनी देश सोडला
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक निदर्शनांनंतर राजीनामा दिल्यानंतर राजधानी ढाका येथून आपल्या बहिणीसह सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झालेल्या आरक्षणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
जीवाला धोका टाळण्यासाठी शेख हसिना या त्यांच्या बहिणीसाठी हेलिकॉप्टरने त्रिपुराच्या आगरतळा येथे पोहोचल्या आहेत.शेख हसिना यांना व्हिडीओतून देशातील नागरिकांना संदेश द्यायचा होता. मात्र लाखो आंदोलक शेख हसिना यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे निघाल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी तात्काळ देश सोडला.
बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये अनेकाचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी टांगेल आणि ढाका येथील महत्त्वाचे महामार्ग ताब्यात घेतले आहेत. हसीना यांच्या सरकारच्या विरोधात सुमारे ४ लाख बांगलादेशी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी २.३० वाजता लष्करी हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले आणि त्या भारतात आल्या असल्याचे म्हटलं जात आहे.