साथीच्या आजाराने दवाखाने हाऊसफुल!
By Admin | Updated: August 9, 2014 22:43 IST2014-08-09T21:56:46+5:302014-08-09T22:43:56+5:30
वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मोठया प्रमाणात या आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करीत आहेत.

साथीच्या आजाराने दवाखाने हाऊसफुल!
वाशिम : वातावरणातील बदलामुळे जिल्हयात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून मोठया प्रमाणात या आजाराचे रूग्ण उपचारासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करीत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात विविध आजाराचे रूग्ण उपचाराकरिता गर्दी करीत असून नोंदणी करीता रांगा लागत आहेत. खासगी दवाखान्यातही मोठया प्रमाणात गर्दी आहे. वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होत असल्याने रूग्णालयात गर्दी वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सद्या पावसाळयाचे दिवस असून या दिवसात स्वच्छता पाळणे अतिशय आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये दररोज शेकडो रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण साथीचे आजाराचे दिसून येत आहेत. खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सुज येणे या आजाराचे रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी दिली. ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणार्या जलकुंभामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने विविध आजाराचे रूग्ण वाढले आहेत. तसेच धुरफवारणी प्रकारचं जिल्हयात होत नसल्याने यामुळे अनेक आजार उदभवत आहेत. यामुळे मेंदुचा हिवताप, उलटया , नाक व तोंडातून रक्त येणे , त्वचेवर डाग पडणे रक्तादाब कमी होणे यासारखे आजार कमी प्रमाणात दिसूनयेत असले तरी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामीण भागात धूरफवारणी करणे गरजेचे झाले आहे. तसेच आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघडयावरील तळलेले पदार्थ टाळावे, रेफ्रीजेटरमधील खाद्य पदार्थ टाळावे, हवेत प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने शक्यतो सकाळी घरीच थांबावे. अस्थमा असलेल्या रूग्णांनी विशेष काळजी या दिवसाची घेणे आवश्यक आहे. औषधोपचारांसह योगा व श्वसननाचा व्यायाम करावा आणि पाणी शुध्द करून जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्यावतिने देण्यात आला आहे. शहरातील घाण पाण्यामध्ये एडीस, इजिप्टाय डासांची उत्पत्ती होत असून यापासून डेंगी ताप, मलेरीया, डायरिया, सर्दी , ताप, डोकदुखी, डेंगी, हिमोजिक फिवर, डेंगी शॉक, सिड्रोम या आजाराची लागण होवू शकते . याठिकाणी पालीका प्रशासनाकडून फाँगीग व फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. त्याकरीता नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देवून नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत लक्ष ठेवून सदर उपाय योजना करणे आवश्यक आहे. या दिवसात सर्वात जास्त आजाराचा त्रास लहान मुलांना सहन करावा लागत आहे. सद्या जिल्हा सामान्य रूग्णालयात येणार्या लहान मुलांना घशात खवखव होणे, डोळे खाजवणे तसेच कान व नाकाच्या आजारांसह सर्दी खोकला व तापाच्या आजारानी ग्रासले आहे. बालकांना श्वसनाचा अधिकच त्रास होत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयांसह शहरातील बाल रूग्णालयामध्ये रूग्णांचीसंख्या वाढली आहे. ढगाळ वातावरण , रिमझिम पाऊस, पाऊसाची दडी दोन तीन दिवसानंतर जोराचा पाउस नंतर कडाक्याचे उन्ह व थंडी या वातावरणातील बदलामुळे जिल्हयात तापाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. खासगीसह जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठया प्रामाणात गर्दी दिसत असून जिल्हयात सर्वाधिक रूग्ण साथीचे आजाराचे दिसत असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयातील गर्दीवरून दिसून येत आहे.