शस्त्रक्रियेविना दुरुस्त केली हृदयाची झडप !

By Admin | Updated: June 23, 2014 03:33 IST2014-06-23T03:33:19+5:302014-06-23T03:33:19+5:30

संधीज्वरामुळे आकुंचित पावलेली हृदयाची झडप छातीचा पिंजरा उघडून शस्त्रक्रिया न करता दुरुस्त करण्याची किमया चेन्नईच्या सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी करून एका १४ वर्षांच्या मुलीला जीवदान दिले आहे.

Corrected Heart Surgery Without Surgery! | शस्त्रक्रियेविना दुरुस्त केली हृदयाची झडप !

शस्त्रक्रियेविना दुरुस्त केली हृदयाची झडप !

चेन्नई : संधीज्वरामुळे आकुंचित पावलेली हृदयाची झडप छातीचा पिंजरा उघडून शस्त्रक्रिया न करता दुरुस्त करण्याची किमया चेन्नईच्या सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी करून एका १४ वर्षांच्या मुलीला जीवदान दिले आहे. मुख्य म्हणजे एरवी खासगी रुग्णालयात ज्यासाठी ५ लाख रुपये खर्च करावे लागले असते तेच वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत केले गेले.
दिव्या अमिनजीकराई या मुलीला चार वर्षांची असताना संधीज्वर झाला होता व त्यावर नीट उपचार न झाल्याने तिच्या हृदयाची झडप आकुंचित झाली होती. त्यामुळे हृदयातून सर्व शरीराला रक्त पुरविण्याचे काम नीटपणे होत नव्हते.
झडप दुरुस्त करण्यासाठी दिव्यावर पाच वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया केली गेली होती. तरीही कमालीची डोकेदुखी व धाप लागणे हा तिचा त्रास कमी झाला नव्हता.
चेन्नईच्या सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी अशा प्रकारचा त्रास दूर करण्यासाठी विना-शस्त्रक्रिया तंत्राचा याआधीही वापर केला होता. पण ते यशस्वी होणारी दिव्या ही आजवरची सर्वांत कमी वयाची रुग्ण आहे.
सरकारी इस्पितळाच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. एम.एस. रवी यांनी
सांगितले की, हृदयाची झडप सर्वसाधारणपणे ६ मिमी रुंदीची असते. पण आम्ही दिव्याला तपासले तेव्हा तिची झडप आकुंचित होऊन जेमतेम १ मिमी रुंदीची झाल्याचे आम्हाला दिसले. संधीज्वर पूर्ण बरा न होता अंगात मुरला तर असे होऊ शकते.
सर्वसाधारणपणे यासाठी ‘ओपन
हार्ट सर्जरी’ केली जाते. तसे केले तर
रुग्णाच्या छातीवर आयुष्यभर मोठा व्रण
राहतो, खर्च खूप येतो व रुग्णाला बरेच दिवस इस्पितळात राहावे लागते. पण आम्ही शस्त्रक्रिया टाळल्याने दिव्या दोन दिवसांत घरी जाऊ शकली. (वृत्तसंस्था)

Web Title: Corrected Heart Surgery Without Surgery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.