CoronaVirus: 30 सेकंदात सापडणार कोरोनाचा रुग्ण, लाळेच्या आधारे कोरोना रुग्णाचा शोध घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:26 IST2020-05-05T13:26:16+5:302020-05-05T13:26:47+5:30
कोरोनाबाधित रुग्णाची तात्काळ तपासणी करणारे ई-कोव-सेंस नावाचे इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग उपकरण तयार करण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आलंय.

CoronaVirus: 30 सेकंदात सापडणार कोरोनाचा रुग्ण, लाळेच्या आधारे कोरोना रुग्णाचा शोध घेणार
कोरोना व्हायरसमुळे जगभर हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तर 30 लाखांपेक्षा अधिक संक्रमित आहे. जगभरातील निम्मी लोक घरात कैद आहेत. या दरम्यान काही देशांत लॉकडाउन शिथिल केले जात आहे. पण लोकांच्या मनात मोठा प्रश्न आहे की, जग कोरोनापासून कधी मुक्त होईल? लॉकडाउन कधी संपेल? आपण पूर्वीसारखे जीवन कधी जगू शकणार? या प्रश्नांच्या दरम्यान एक आशादायक बातमी आली आहे.
कोरोनाचा रुग्ण शोधणं आता आणखी जलद आणि सुलभ होणार आहे. कोरोनाबाधित रुग्णाची तात्काळ तपासणी करणारे ई-कोव-सेंस नावाचे इलेक्ट्रोकेमिकल सेन्सिंग उपकरण तयार करण्यात भारतीय वैज्ञानिकांना यश आलंय. लाळेचा नमुना घेताच अवघ्या 10 ते 30 सेकंदांमध्ये हे उपकरण त्याचा अहवाल देते असा दावा करण्यात आलाय.
लाळेचा नमुना ठेवताच कोरोना विषाणू स्पाईक प्रोटीन एंटीजनबाबत हे उपकरण तात्काळ संकेत देते असा दावा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍनिमल बायोटेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांपैकी एकाने 'जागरण'शी बोलताना केला आहे. या उपकरणाला वैधतेसाठी सरकारकडे अर्ज पाठवण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाचे रुग्ण जलद गतीने शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाधिक तपासण्या होणे गरजेचे आहे. यासाठी ई-कोव-सेंस नावाचे इलेक्ट्रोकेमिकल उपकरण उपयुक्त ठरणार असल्यादा दावा करण्यात येतोय.