CoronaVirus News: दुकान कामगार, भाजीविक्रेते यांचीही कोरोना चाचणी करा; केंद्राचे राज्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:42 IST2020-08-09T05:26:46+5:302020-08-09T06:42:38+5:30
मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत खाली आणणार

CoronaVirus News: दुकान कामगार, भाजीविक्रेते यांचीही कोरोना चाचणी करा; केंद्राचे राज्यांना आदेश
नवी दिल्ली : किराणा मालाच्या दुकानातील कर्मचारी, भाजी, फळविक्रेते यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे.
या लोकांपैकी जे कोरोनाग्रस्त असतील त्यांच्यामुळे या संसगार्चा फैलाव आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी प्राधान्याने करण्यात यावी, असे सरकारने म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा असायलाच हवी. एखाद्या रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी संपर्क साधल्यानंतर किती वेळात त्यांच्याकडे रुग्णवाहिका पोहोचते किंवा रुग्णवाहिका येण्यास नकार मिळतो यावर राज्यांनी दररोज बारीक लक्ष ठेवले पाहिजे. नकाराचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
वयोवृद्धांची काळजी घ्या : आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, घरोघरी जाऊन चाचणी करण्याचेही अनेक फायदे आहेत. घरातील वयोवृद्ध, गरोदर महिला यांच्या प्रकृतीला कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना जपणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ऑगस्टमध्ये भारतात सापडले सर्वाधिक नवे रुग्ण
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अमेरिका, ब्राझिलमधील नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. शुक्रवारी ६१,३३७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २०,८८,६११ झाली आहे.
कोरोनामुळे आणखी ९३३ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ४२,५१८वर पोहोचली आहे.सध्या देशात ६,१९,०८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १४२७००६ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६८.३२ टक्के झाले आहे. सलग दहाव्या दिवशी कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.