coronavirus : तेलंगणा सरकारने लॉकडाऊन वाढवले, 3 ऐवजी 7 मेपर्यंत सर्व व्यवहार राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 22:18 IST2020-04-19T22:14:10+5:302020-04-19T22:18:18+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.

coronavirus : तेलंगणा सरकारने लॉकडाऊन वाढवले, 3 ऐवजी 7 मेपर्यंत सर्व व्यवहार राहणार बंद
हैदराबाद - कोरोनाचा वाढता फैलाव आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तेलंगणा सरकारने राज्यातील लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 7 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, तेलांगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चार दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तेलंगणामध्ये 3 ऐवजी 7 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १५७१२ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर ५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या १४ दिवसांत २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची कोणतीही घटना समोर आली नाही. तर देशभरात २२३१ कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत १३३४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे.