CoronaVirus: "पायाभूत सुविधा उभारताना यापुढे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ अनिवार्य"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:30 IST2020-04-25T04:29:26+5:302020-04-25T04:30:21+5:30
‘कोविड-१९’ मधून धडा न घेतल्यास भविष्य भयावह- पी. एस. उत्तरवार :

CoronaVirus: "पायाभूत सुविधा उभारताना यापुढे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ अनिवार्य"
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : ‘कोविड-१९’सारख्या महामारीतून धडा घेऊन आता यापुढे पायाभूत सुविधांचा विकास करताना फिजिकल डिस्टन्सिंगचा अगोदर विचार लागेल. ते राखले जाईल, अशा पद्धतीनेच विकास आराखडा बनवावा लागेल. यातून गृहनिर्माण क्षेत्रदेखील सुटणार नाही. एकूणच वर्क कल्चरबरोबरच पायाभूत सुविधांचे डिझाइनदेखील बदललेले असेल, असे दिल्ली विकास प्राधिकरणाचे माजी अतिरिक्त आयुक्त पी. एस. उत्तरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मूळ चंद्रपूरचे रहिवासी असलेले उत्तरवार ३ दशकांपासून नगर नियोजनात काम करीत असून, सध्या रेल्वे स्थानक विकास योजनेचे आरेखन तज्ज्ञ आहेत. या भयंकर आजारातून आपण धडा घेणार नसू तर भविष्य भयावह आहे, असा इशारा सुरुवातीलाच देऊन उत्तरवार म्हणाले की, पायाभूत सुविधांचा सर्वोच्च विकास झालेल्या देशांनाही कोरोनाचे संकट पेलता आलेले नाही. जगभरात त्यामुळे पायाभूत सुविधांची संरचना बदलेल.
भारताला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कार्यालय व रहिवास इमारतींची रचना बदलावी लागेल. पायाभूत सुविधा उभारताना केवळ नफाकेंद्रित मॉडेल आता टिकणार नाही.
शॉपिंग मॉल्सची रचना बदलेल. रेस्टॉरेंट, हॉटेल, फिरण्याच्या जागांची रचना बदलण्यात येईल. तेथे उच्च दर्जाची स्वच्छता राखावीच लागेल. चित्रपगृहदेखील छोटी होतील. कमी गुंतवणुकीत आधुनिक सुविधा हेच स्वरूप असेल. रेल्वेमध्ये तिकीट तपासण्याऐवजी क्यूआर कोड असायला हवा. लिफ्टमध्ये असलेला कोड तुम्ही मोबाईलवर स्कॅन करायचा व इच्छित मजल्यावर जायचे. तंत्रज्ञानकेंद्रित पायाभूत सुविधांचे जग जवळ करावे लागेल, असेही उत्तरवार म्हणाले.
बिल्डरची जबाबदारी वाढणार
गृहनिमार्णाविषयी ते म्हणाले की, दाटीवाटीने घरे उभारायची, कमी जागेत जास्तीत जास्त घरांमधून नफा कमवायचा हे बिल्डरांचे व्यावसायिक धोरण टिकणार नाही. सोसायटी स्थापन झाली, की काम संपले, हेही नाही चालणार. बांधकाम साईटवर काम करणारे कुठे जातात, याचा विचार करावाच लागेल. बिल्डरची जबाबदारी वाढेल.
नव्या कार्यसंस्कृतीचे आगमन
आता तर ‘वर्क फ्रॉम होम’ कल्चर वाढले. कार्यालयासाठी मोठ्या जागेची गरज नसल्याचा ट्रेंड वाढू लागला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वाढल्या. इंटरनेटचा वापर वाढल्याने फाईल्सला लागणारी जागाही वाचेल. हे ‘वर्क कल्चर’ रोजगारही कमी करेल. पण ‘एकाच ठिकाणी अनेक वर्षे एकच काम’ हे कल्चर बदलेल. वर्षातून काही महिनेच पगार मिळेल. पायाभूत सुविधांमधील बदल नवी कार्यसंस्कृतीही घेवून येतील.