CoronaVirus : पुस्तक विक्रेत्याच्या संपर्कात आल्यामुळे ९ जणांना कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 13:38 IST2020-04-19T13:37:30+5:302020-04-19T13:38:18+5:30
CoronaVirus : याआधी लुधियानामध्ये भाजी मार्केटमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.

CoronaVirus : पुस्तक विक्रेत्याच्या संपर्कात आल्यामुळे ९ जणांना कोरोनाचा संसर्ग
पटियाला - देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंजाब मधील पटियाला जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. शनिवारी जिल्ह्यात एका दिवसात १५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. यामध्ये ९ रुग्ण पटियालामधील आहेत. तर ६ राजपुरा येथील आहेत. पटियालामधील जे ९ रुग्ण आहेत. त्यांना एका पुस्तक विक्रेत्यापासून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. पटियालामध्ये आतापर्यंत २६ कोरोना बाधित रुग्ण आहेत.
याआधी लुधियानामध्ये भाजी मार्केटमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.१३ एप्रिल भाजी मार्केटमधील अधिकाऱ्यांनी आणि अडत व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये सॅनिटायझर केले होते. मात्र, आता यामधील एक अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
पंजाबमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. तसेच, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. पंजाबमध्ये अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
याचबरोबर, लुधियाना येथील सहायक पोलीस आयुक्तांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १३ एप्रिलला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज शनिवारी अपयशी ठरली.
दरम्यान, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पोलीस आणि सरकारी कर्मचारी एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. यांच्यासोबतची एकता आणि पंजाब सरकारच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी पंजाब काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'थाळीनाद' कार्यक्रमासारखे येत्या २० एप्रिलला संध्याकाळी सहा वाजता 'जयघोष दिवस' साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
पंजाब काँग्रेसने लोकांना २० एप्रिलला घरातच राहून 'जो बोले सो निहाल' आणि 'हर हर महादेव' अशा घोषणा देण्याचे आवाहन केले आहे.