CoronaVirus News: संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली खजुराहोकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:48 AM2020-06-16T02:48:26+5:302020-06-16T02:49:21+5:30

सर्व हॉटेल रिकामी; सगळ्यांचे व्यवसाय आले अडचणीत

CoronaVirus outbreak leaves Khajuraho gasping flattens tourism | CoronaVirus News: संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली खजुराहोकडे पाठ

CoronaVirus News: संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली खजुराहोकडे पाठ

Next

भोपाळ : शाळा, महाविद्यालयांच्या सुट्या लागताच देशभरात पर्यटन वाढते. मध्य प्रदेशातील खजुराहोलाही पर्यटकांची एकच गर्दी होते. तिथे आलेले हजारो पर्यटक खजुराहोनंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळांना भेटी देतात. पण यंदा शाळा-महाविद्यालये सुरू झाली नसली तरी नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पण कोरोनामुळे तब्बल ७५ दिवसांची सुटी असूनही यंदा खजुराहोला पर्यटक आलेच नाहीत. त्यामुळे येथील हॉटेल रिकामी आहेत आणि पर्यटन आणि पर्यटकांवर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय आणि छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

मार्चपासून रेल्वेगाड्या बंद झाल्या. बराच काळ विमानसेवाही बंद होती आणि बसेसही लोकांविना रस्त्यांवर उभ्या होत्या. या ७५ दिवसांत त्यामुळे राज्याबाहेरील वा परदेशी पर्यटक तर सोडाच, पण मध्य प्रदेशातील कोणीही खजुराहोला आले नाही. उन्हाळ्याच्या काळात विवाहांचे अनेक मुहूर्त असतात आणि त्यामुळे बरीच जोडपी खजुराहोला हमखास येतात. पण यंदा लॉकडाऊ न आणि निर्बंधांमुळे विवाहही पुढे ढकलले गेले. काहींनी केवळ घरच्या मंडळींच्या उपस्थितीतच विवाह केले. पण त्यानंतर जोडप्यांना हनिमूनला वा फिरायला जाण्याची संधीच मिळाली नाही.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून खजुराहो आणि परिसरातील सर्व हॉटेल बंद आहेत आणि पर्यटनावर अवलंबून असलेले सुमारे अडीच लाख लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. आता हळूहळू निर्बंध उठण्यास सुरुवात झाली असली तरी पावसाळा सुरू होत असल्याने आणि अद्यापही कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती असल्याने या काळात पर्यटक येण्याची शक्यता अजिबातच नाही. पर्यटनाचे तीन महिने आम्ही घरीच बसून काढले आणि दिवाळीपर्यंत तरी स्थिती सुधारेल का, हे सांगता येत नाही, असे अनेक दुकानदार, छोटे व्यावसायिक यांनी बोलून दाखविले. (वृत्तसंस्था)

एकही विदेशी दिसला नाही
गेल्या तीन महिन्यांत आम्ही एकही परदेशी पर्यटक वा व्यक्ती पाहिली नाही, असे एका व्यावसायिकाने सांगितले. तो म्हणाला, खजुराहोहून भोपाळ
३५0 किलोमीटर अंतरावर आहे. पण विमानसेवाच बंद होती. त्यामुळे कोणी इथे फिरकलेच नाही. शिवाय जगभर कोरोनाचा कहर असताना आणि जगभरात विमानसेवा बंद असताना परदेशी लोक येथील, अशी अपेक्षा ठेवणेही चुकीचेच होते.

Web Title: CoronaVirus outbreak leaves Khajuraho gasping flattens tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.