Coronavirus: The number of coronaviruses in India has risen to 600; The first death in Tamil Nadu | Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली ६०० च्या पुढे; तामिळनाडूत पहिला मृत्यू

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली ६०० च्या पुढे; तामिळनाडूत पहिला मृत्यू

कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येने बुधवारी ६०० ची संख्या ओलांडली. दरम्यान, लष्कर व केंद्रीय निमलष्करी दलाने कोरोनाग्रस्तांसाठी २,००० पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था केली आहे, तसेच हिमाचल प्रदेशात हमीरपूर जिल्हा प्रशासनाने नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या वसतिगृहातील २००० खोल्या रुग्णांसाठी घेतल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसने महाराष्टÑात ११६ व केरळात १०९ रुग्णांची संख्या ओलांडली आहे. देशातील ६१२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५६२ जण सध्या या आजाराने ग्रस्त आहेत, तर ४० जण बरे झालेले आहेत. तामिळनाडूत एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निमलष्करी दलाची देशभरातील ३२ रुग्णालये सरकारने ताब्यात घेतली आहेत. त्यामध्ये १,९०० खाटा आहेत. केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटियन सीमा पोलीस व सशस्त्र सीमा बलची ही रुग्णालये ग्रेटर नोएडा, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू-तेकानपूर (ग्वाल्हेर), दिमापूर, इम्फाळ, नागपूर, सिल्चर, भोपाळ, आवाडी, जोधपूर, कोलकाता, पुणे व बंगळुरू येथील ही रुग्णालये आहेत. सीमा सुरक्षा करणाऱ्या आयटीबीपीमध्ये तर देशातील सर्वांत मोठे क्वारंटाईन सेंटर चालवले जात आहे. तेथे १,००० जणांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना व्हायरससंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी एक व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. 9013151515 असा तो नंबर असून, त्यावरील सेवा २४ तास सुरू असेल, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus: The number of coronaviruses in India has risen to 600; The first death in Tamil Nadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.