CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण असणार? तज्ज्ञांच्या उत्तरानं मोठ्ठं टेन्शन दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 22:30 IST2021-07-15T22:29:51+5:302021-07-15T22:30:26+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या संभाव्य लाटेबद्दल तज्ज्ञांनी दिली महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण असणार? तज्ज्ञांच्या उत्तरानं मोठ्ठं टेन्शन दूर
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या लाटेनं शिखर गाठलं होतं. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल लोकांच्या मनात मोठी भीती आहे. तिसऱ्या लाटेशी संबंधित लोकांना पडलेल्या प्रश्नांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत (आयसीएमआर) महामारीशी संबंधित विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. समीरन पांडा यांनी उत्तरं दिली आहेत.
कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टच्या अखेरपर्यंत येईल. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी धोकादायक नसेल, अशी माहिती समीरन पांडा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. 'देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र ती दुसऱ्या लाटेइतकी विध्वसंक नसेल,' अशी काहीशी दिलासादायक माहिती पांडा यांनी सांगितली. बहुतांश लोक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत नसल्यानं तिसरी लाट नक्की येणार असल्याचा धोक्याचा इशारा याच आठवड्यात भारतीय वैद्यकीय संघटनेनं याच आठवड्यात दिला आहे.
चार कारणांमुळे येणार तिसरी लाट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे चार प्रमुख कारणं असतील, असं डॉ. पांडा यांनी सांगितलं. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान प्राप्त झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये घट झाली असल्यानं तिसरी लाट येऊ शकेल. सध्या कोरोनाचे नवे व्हेरिएंट धोकादायक ठरत आहेत. या व्हेरिएंट्सनी रोगप्रतिकारशक्ती आणि लसीला चकवा दिल्यास तिसऱ्या लाटेचा धोका वाढेल, असं पांडा म्हणाले.
कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्यात अपयशी ठरले. मात्र ते अधिक संक्रामक असले, तर त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यानं निर्बंधांत दिल्या गेलेल्या सवलती हे तिसरी लाट येण्यामागील महत्त्वाचं कारण ठरू शकतं. राज्यांनी निर्बंध हटवण्याची भूमिका कायम ठेवल्यास रुग्णांची संख्या वेगानं वाढेल, असा धोक्याचा इशारा पांडा यांनी दिला.