CoronaVirus News : सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांच्या कोरोनास्थितीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:10 IST2021-04-11T01:18:27+5:302021-04-11T07:10:20+5:30
Sonia Gandhi : पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले.

CoronaVirus News : सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांच्या कोरोनास्थितीचा घेतला आढावा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार देशातील कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका यावेळी सोनिया गांधी यांनी केली.
या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदि उपस्थित होते. पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले.
आपापल्या राज्यातील जनतेला अधिकाधिक लसी कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केले. तसेच राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचा सल्लाही सोनिया यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार देशात कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून काँग्रेसशासित राज्यांनी आपल्या प्रयत्नात कसूर करू नये, असा आदेशही सोनिया गांधी यांनी यावेळी दिला.
केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
कोरोना साथीच्या काळात आम आदमीच्या हातात पैसे देण्याचे आवाहन करताना राहुल गांधी म्हणाले की, या गर्विष्ठ सरकारला सूचनांचीही ॲलर्जी आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सरकारने लसीकरणाला गती द्यावी आणि स्थलांतरीत कामगारांच्या हातात पैसा द्यावा.