CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहानग्यांना किती धोका?; WHO-AIIMSचा महत्त्वपूर्ण अहवाल समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 07:49 IST2021-06-18T07:47:58+5:302021-06-18T07:49:53+5:30
CoronaVirus News: एम्स आणि डब्ल्यूएचओकडून देशात सीरो सर्वेक्षण; अंतरिम आकडेवारी प्रसिद्ध

CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहानग्यांना किती धोका?; WHO-AIIMSचा महत्त्वपूर्ण अहवाल समोर
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यादृष्टीनं अनेक राज्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लहान मुलांसाठीचे बेड्स, त्यांच्यासाठीच्या वेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा (एम्स) एक अहवाल समोर आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एम्सनं केलेल्या सीरो सर्वेक्षणातील आकडेवारी दिलासा देणारी आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना वयस्करांच्या तुलनेत अधिक धोका नसेल, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. वयस्करांच्या तुलनेत लहान मुलांमधील SARS-CoV-2 सीरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं सर्वेक्षण सांगतं. देशाच्या ५ राज्यांमधील १० हजार व्यक्तींचा सर्वेक्षणात सहभाग होता. या सर्वेतील अंतरिम आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. तर अंतिम आकडेवारी लवकरच अपेक्षित आहे.
एम्स दिल्लीचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. पुनीत मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानुसार दक्षिण दिल्लीतल्या शहरी भागांमध्ये असलेल्या रिसेटलमेंट वसाहतींमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त (७४.७ टक्के) होता. या वसाहतीत लोकसंख्येची घनता अधिक आहे. जास्त पॉझिटिव्हिटी रेटचा अर्थ बहुतांश लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रतिकार करू शकणाऱ्या अँटिबॉडी तयार झाल्या आहेत असा होतो. दुसऱ्या लाटेच्या आधीही दक्षिण दिल्लीत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त होता.