CoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट?; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 11:17 IST2021-12-05T11:16:53+5:302021-12-05T11:17:52+5:30
CoronaVirus News: भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ४ रुग्णांची नोंद; कर्नाटकात २, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला

CoronaVirus News: ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट?; पुढील ८ आठवडे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे
नवी दिल्ली: आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं गुरुवारी देशात शिरकाव केला. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळून आले. यानंतर काल गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४ रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनमुळे देशात तिसरी लाट येणार का, अशी चिंता लोकांना सतावू लागली आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही, याचं उत्तर पुढील काही आठवड्यांमध्ये मिळेल. पुढल्या ६ ते ८ आठवड्यांमध्ये याबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध होईल, असं राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं. आम्ही लसीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लोकांनी मास्कचा वापर करावा आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
सध्याच्या घडीला ओमायक्रॉन व्हेरिएंटसोबत बरेच अज्ञात व्हेरिएंट आहेत. आपण घाबरण्याची गरज नाही. पण सगळ्यांनीच सतर्क राहायला हवं, असं राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं. ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेणार का, ते आपल्याला पाहावं लागेल. पुढील सहा ते आठ आठवडे महत्त्वाचे आहेत. भारतात ओमायक्रॉनचा परिणाम काय होणार ते या कालावधीत समजेल, असं जोशी म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाचं राज्यांना पत्र
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, जम्मू-काश्मीर, ओदिशा आणि मिझोरमला पत्र लिहिलं. 'कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, लसीकरण, कोविड प्रोटोकॉलचं पालन या पंचसूत्रीचं पालन आवश्यक आहे. त्या अनुषंगानं आवश्यक पावलं उचला,' अशी सूचना आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. याआधी २७ नोव्हेंबरला मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं होतं. 'आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर नजर ठेवा, हॉटस्पॉटवर विशेष लक्ष द्या, संक्रमित लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांचा त्वरित शोध घ्या. संक्रमितांचे नमुने जिनॉम सिक्वन्सिंगसाठी पाठवा, आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घ्या,' अशा अनेक सूचना मंत्रालयाकडून राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आल्या आहेत.