CoronaVirus News : राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत दिल्लीत घटले रुग्णवाढीचे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 06:31 IST2020-07-13T05:21:49+5:302020-07-13T06:31:24+5:30
२९ जून ते १२ जुलै या पंधरवड्यात दिल्ली व राष्ट्रीय स्तरावरील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता दिल्लीने मिळविलेले यश लक्षात येते.

CoronaVirus News : राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत दिल्लीत घटले रुग्णवाढीचे प्रमाण
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : संपूर्ण देशात रविवारी एका दिवसात २८,६३७ इतक्या विक्रमी संख्येने रुग्ण सापडले असतील किंवा ५५१ बळी गेले असले तरी या आकडेवारीच्या दिल्लीने रुग्णवाढीचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे तसेच या राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे.
२९ जून ते १२ जुलै या पंधरवड्यात दिल्ली व राष्ट्रीय स्तरावरील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची तुलना करता दिल्लीने मिळविलेले यश लक्षात येते. या कालावधीत देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत ६.२ टक्क्यांवरून ७.३ टक्के इतकी वाढ झाली. देशात २९ जूनला कोरोनाचे ७.१३ लाख रुग्ण होते. हाच आकडा १२ जुलैला ८.४९ लाखांवर जाऊन पोहोचला. मात्र दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत २.१ टक्क्यांनी घट झाली. तिथे या रुग्णांचे १६.७ टक्के असलेले प्रमाण घसरून १४.१ टक्के झाले आहे. याच पंधरवड्यात दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ४.९८ लाखांवरून ७.४७ लाखांपर्यंत वाढली. दिल्लीमध्ये २९ जून रोजी २०८४ नवे रुग्ण आढळले होते. ते प्रमाण १२ जुलै रोजी १८७१ पर्यंत खाली घसरले आहे. दिल्लीत २९ जून रोजी या आजाराने ६५ जण मरण पावले होते तर ५ जुलै रोजी हा आकडा ७१ पर्यंत वाढला व १२ जुलैला तो खाली घसरून ३४ झाला. याच कालावधीत २९ जून रोजी देशामध्ये मरण पावलेल्यांची संख्या ४१८ होती व १२ जुलै रोजी ही संख्या ५५१ इतकी नोंदविली गेली. देशात सध्या दररोज सुमारे ३ लाख कोरोना चाचण्य होत असून रविवारी या चाचण्यांनी १.१५ कोटीचा आकडा पार केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मनपा हे एकजुटीने लढा देत आहेत.