CoronaVirus News: कोरोनाचे ५४ लाख रुग्ण झाले बरे; देशात ९ लाख लोकांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 07:02 IST2020-10-04T03:05:49+5:302020-10-04T07:02:38+5:30
CoronaVirus News: एकूण रुग्णसंख्या ६४ लाख ७३ हजारावर; मृतांची संख्या एक लाखावर

CoronaVirus News: कोरोनाचे ५४ लाख रुग्ण झाले बरे; देशात ९ लाख लोकांवर उपचार सुरू
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या बळींची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. शनिवारी आणखी १०६९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १,००,८४२ झाली आहे. तसेच कोरोनाचे ७९,४७६ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६४ लाख ७३ हजारावर पोहोचली आहे, तर ५४ लाख लोक या आजारातून बरे झाले आहेत.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६४,७३,५४४ असून, बरे झालेल्यांचा आकडा ५४,२७,७०६ आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८३.८४ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ९,४४,९९६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १४.६० टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५६ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.
कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,६५३, कर्नाटकात ९,११९, उत्तर प्रदेशमध्ये ५,९१७, आंध्र प्रदेशमध्ये ५,९००, दिल्लीत ५,४३८, पश्चिम बंगालमध्ये ५,०७०, पंजाबमध्ये ३,५०१, गुजरातमध्ये ३,४७५ इतकी आहे. या बळींपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोक एकापेक्षा जास्त व्याधींनी ग्रस्त होते.
जगात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांच्या क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या अमेरिकेमध्ये आता ७५ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांहून कमी आहे, तर या क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या ब्राझीलमध्ये ४८ लाख ८२ हजार कोरोना रुग्ण आहेत.
चाचण्या ७ कोटी ७८ लाखांवर
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल सायन्सेस (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २ आॅक्टोबर रोजी ११,३२,६७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ७,७८,५०,४०३ झाली आहे.