CoronaVirus News: चिंता वाढली! आफ्रिकेतून आलेल १० परदेशी नागरिक बेपत्ता; फोन बंद; प्रशासनाची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:28 IST2021-12-03T15:18:57+5:302021-12-03T15:28:00+5:30
CoronaVirus News: आफ्रिकेतून आलेल्या १० जणांचा ठावठिकाणा सापडेना; फोन बंद असल्यानं ट्रेसिंग करण्यात अडचणी

CoronaVirus News: चिंता वाढली! आफ्रिकेतून आलेल १० परदेशी नागरिक बेपत्ता; फोन बंद; प्रशासनाची झोप उडाली
बंगळुरू: कर्नाटकमध्ये काल दोन ओमायक्रॉन बाधित आढळून आले. देशात पहिल्यांदाच ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्यानं चिंता वाढली असताना आता बंगळुरूतून आणखी एक काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. आफ्रिकन देशांतून आलेले १० परदेशी नागरिक बेपत्ता झाले आहेत. बंगळुरू महानगरपालिका आणि आरोग्य अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप तरी त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.
कालच बंगळुरूत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला. तोदेखील दक्षिण आफ्रिकेतून परतला होता. त्यानंतर आता आफ्रिकेतून परतलेल्या १० जणांशी संपर्क होत नसल्यानं प्रशासन चिंतेत आहे. आफ्रिकेतील देशांमधून आलेल्या १० जणांचे फोन स्विच्ड ऑफ आहेत. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत आहेत.
आफ्रिकेतील देशांमधून परतलेल्या नागरिकांशी संपर्क होत नसल्याची माहिती बंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी दिली. त्या सगळ्या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रॉन आढळून आल्यापासून दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूत ५७ प्रवासी दाखल झाले आहेत. यापैकी १० जणांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे फोन स्विच्ड ऑफ येत आहेत. या प्रवाशांनी विमानतळावर त्यांचा पत्ता सांगितला होता. मात्र त्या पत्त्यावर ते सापडलेले नाहीत.
आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचा रुग्ण सर्वात आधी सापडला. ओमायक्रॉननं कालच भारतात शिरकाव केला. बंगळुरूत दोन रुग्ण आढळले. त्यांचं वय ६६ आणि ४६ वर्ष आहे. दोघांमध्ये हलकी लक्षणं आढळून आली आहेत.