Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारचा ‘बिग प्लॅन’; तीन टप्प्यांची आखली रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:46 IST2020-04-09T15:43:42+5:302020-04-09T15:46:45+5:30
केंद्र सरकारचा हा प्लॅन केंद्र आणि राज्य यांच्यातील बैठकीनंतर समोर आला आहे.

Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारचा ‘बिग प्लॅन’; तीन टप्प्यांची आखली रणनीती
नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न करत आहे. आता मोदी सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी तीन टप्प्यातील रणनीती आखत आहे. केंद्राने कोविड १९ विरुद्ध लढाईत राज्यांसाठी पॅकेज जारी केले आहे.
राज्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजमध्ये इमरजेन्सी रिस्पॉन्स अँन्ड हेल्थ सिस्टिम प्रिपेअरनेस पॅकेज असं नाव दिलं आहे. या पॅकेजसाठी पूर्णत: १०० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. कोरोनाविरुद्धची लढाई मोठ्या काळापर्यंत सुरु राहणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या गेलेल्या पत्राप्रमाणे हा प्रकल्प तीन टप्प्यात असणार आहे.
पहिला टप्पा जानेवारी २०२० ते जून २०२०, दुसरा टप्पा जुलै २०२० ते मार्च २०२१, तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते २०२४ अशाप्रकारे तीन टप्पे असणार आहे. पहिल्या टप्प्यात कोविड १९च्या उपचारासाठी हॉस्पिटल विकसित करणे, आयसोलेशन ब्लॉक बनवणे, व्हेंटिलेटर सुविधा असणारे आयसीयू बनवणे, पीपीई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) एन ९५ मास्क, व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करणे. तसेच तपासणी केंद्र वाढवणे, त्याचसोबत निधीचा वापर महामारीविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाईल. निधीचा एक हिस्सा रुग्णालय, सरकारी कार्यालये, जनसुविधा, रुग्णवाहिका यांना संक्रमित होण्यापासून वाचवणे यासाठी खर्च केला जाईल.
केंद्र सरकारचा हा प्लॅन केंद्र आणि राज्य यांच्यातील बैठकीनंतर समोर आला आहे. राज्य सरकारकडून कोविड १९ च्या विरोधात लढण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी वारंवार केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत पंतप्रधानांसमोरही हा मुद्दा अनेकांनी उपस्थित केला. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काय काय असणार याबाबत खुलासा होणं बाकी आहे. पहिल्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन यामध्ये बदल करुन तसं नियोजन करण्यात येणार आहे.