CoronaVirus News : खळबळजनक! कोरोनात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी गमावले आई-बाबा; सरकारी आकडेवारीची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:08 IST2022-03-24T15:55:56+5:302022-03-24T16:08:02+5:30
Corona Virus News : चिमुकल्यांच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

CoronaVirus News : खळबळजनक! कोरोनात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी गमावले आई-बाबा; सरकारी आकडेवारीची पोलखोल
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,938 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,16,672 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाने अनेक हसती-खेळती घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत.
चिमुकल्यांच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना काळात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी आई किंवा बाबा यामधील एकाला गमावलं आहे. सरकारी आकडेवारीची आता पोलखोल झाली आहे.आईवडील गमावलेल्या मुलांचे आकडे गुजरात विधानसभेमध्ये आता समोर आले आहेत. त्यामुळे सरकारी कागदपत्रांमध्ये असलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीची पोलखोल झाली आहे.
आई आणि वडील हे दोन्ही गमावलेल्या लहान मुलांना दर महिना चार हजार रुपये तर पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा याआधी गुजरात सरकारने केली आहे. विधानसभेत जेव्हा हे आकडे समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत सरकारकडे 27 हजार 674 अर्ज हे मदतीसाठी आले आहेत. ज्यामधील 20,970 अर्ज हे स्वीकारण्यात आले आहेत. तर 3 हजार 665 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. 3009 अर्जांवर सरकारचा निर्णय अद्याप बाकी आहे.
हैराण करणारी बाब म्हणजे गुजरात सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 हजार 942 सांगितली आणि आता आई किंवा वडील गमावलेल्या मुलांच्या अर्जाचा आकडा हा 20 हजारांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच सरकारने कोरोना मृतांचे जे आकडे सांगितले त्यात घोळ असल्याचं समोर आलं आहे. गुजरातमध्ये सर्वात जास्त अर्ज हे राजकोटमधून आले आहेत. सूरत, अहमदाबाद, वडोदरामधून देखील अनेकांना अर्ज केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.