CoronaVirus: महाराष्ट्रातल्या कोरोना नियंत्रणासाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:10 IST2020-04-24T04:04:54+5:302020-04-24T07:10:06+5:30
आणखी एक आंतरमंत्रालयीन पथक पाठविणार

CoronaVirus: महाराष्ट्रातल्या कोरोना नियंत्रणासाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रासोबत समन्वय राखत केंद्र सरकारने राज्यांत आणखी एक आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक पाठविले आहे. याआधी केंद्राने महाराष्ट्रात दोन पथके पाठवली होती.
या पथकांचे मुख्य लक्ष मुंबई, पुणे आणि नागपूरवर आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने येथे संसर्ग पसरण्याचा धोका आहे. केंद्रीय पथके या आठवड्यात मुंबई, पुणे आणि नागपूरच्या दौरा करून येथील स्थितीबाबत केंद्र सरकारला अहवाल देतील.
देशभरातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील रुग्णांची आणि मृतांची संख्या सर्वाधिक असून, सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यानंतर पुणे आणि नागपुरात रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे.
प्रत्येक पथकात ६ सदस्य
कोरोना विषाणूंचा सर्वाधिक फैलाव महाराष्ट्रात झाला आहे. आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथके (आयएमसीटी) येथील स्थितीचा आढावा घेऊन गृहमंत्रालयाला अहवाल देतील. प्रत्येक पथकात सहा सदस्य आहेत. अहवालात स्थिती सुधारण्यासाठी ही पथके उपायही सुचवितील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.