coronavirus ministry of power gives important instructions after pm modi appeals to turn off lights for 9 minutes kkg | CoronaVirus: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानं वाढली चिंता; ऊर्जा मंत्रालयानं केल्या महत्त्वाच्या सूचना

CoronaVirus: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानं वाढली चिंता; ऊर्जा मंत्रालयानं केल्या महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली: कोरोनाविरोधातील लढाईत देशवासीयांची एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील लाईट्स बंद करण्याचं आवाहन केलं. मात्र मोदींच्या आवाहनामुळे ऊर्जा मंत्रालयाची चिंता वाढली आहे. लोकांनी अचानक विजेचा वापर बंद केल्यास त्याचा ग्रीडवर विपरित परिणाम होण्याची चिंता ऊर्जा मंत्रालयाला सतावते आहे. त्यामुळे अशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वीज विभागातले कर्मचारी कामाला लागले आहेत.

उद्या रात्री नऊ वाजता देशातल्या कोट्यवधी नागरिकांनी विजेचा वापर बंद केल्यास ग्रीडवरील भार अतिशय कमी होईल. हा भार शून्याच्या आसपास असल्यास फिडर्स आणि उपकेंद्रांवर परिणाम होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी ऊर्जा विभागाकडून विशेष तयारी केली जात आहे. भार शून्यावर येऊ नये यासाठी उपकेंद्रावरील कॅपिसेटर बँक उघडले जातील. याशिवाय जास्त क्षमतेच्या उपकेंद्रांवरील रिऍक्टर सुरू केले जातील. नऊ वाजता अचानक ग्रिडवरील भार शून्यावर येऊ नये आणि नऊ वाजून नऊ मिनिटांनी तो अचानक वाढू नये यासाठी उपकेंद्रांवर कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. संध्याकाळी ७ ते रात्री ११ अशी त्यांची कामकाजाची वेळ असेल.

विजेचा वापर अचानक थांबून भार शून्यावर येऊ नये यासाठी ऊर्जा मंत्रालयानं ग्राहकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ग्राहकांनी नऊ वाजता लाईट्स बंद करावेत. मात्र कूलर, पंखा, फ्रिज यासारखी उपकरणं बंद करू नये, असं आवाहन ऊर्जा मंत्रालयानं केलं आहे. ग्रीडवर परिणाम होऊ नये आणि वीज पुरवठा खंडित होऊ या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्रालयाकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus ministry of power gives important instructions after pm modi appeals to turn off lights for 9 minutes kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.