CoronaVirus: स्थलांतरित कामगार अर्धपोटी; सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 07:12 IST2020-04-24T04:38:29+5:302020-04-24T07:12:11+5:30
लॉकडाऊनमध्ये सुरू आहेत हाल

CoronaVirus: स्थलांतरित कामगार अर्धपोटी; सरकारकडून अपुरा धान्यपुरवठा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीपायी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम या औद्योगिक विभागांत अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित कामगारांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. त्यांना सरकारतर्फे देण्यात येणारे अन्नधान्य अपुरे आहे. त्यामुळे ते व त्यांच्या सोबत असलेले कुटुंबीय यांना अर्धपोटी राहायचे प्रसंग येत आहेत. तसेच निर्बंधांचे कडक पालन करण्याच्या नावाखाली या मजुरांना कधीकधी पोलिसांच्या काठीचा प्रसादही मिळत आहे. आपल्या मूळ गावी कधी परतायला मिळेल याकडे हे स्थलांतरित कामगार डोळे लावून बसलेले आहेत.
शाहदरा, साहिबाबाद, गुरूग्राम आदी ठिकाणच्या औद्योगिक वस्त्यांमध्ये दरमहा ७ ते १० हजार रुपये कमावणाऱ्या अर्धकुशल कामगारांचे, त्यातही जे कुटुंबीयांबरोबर राहातात त्यांचे तर विलक्षण हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे गेले महिनाभर उद्योगधंदे बंद आहेत. सरकारकडून मिळणारे अन्नधान्य अपुरे असून त्यामुळे बऱ्याचदा अर्धपोटी राहावे लागत आहेत. मूळ गावी परत जाईपर्यंत आपण जिवंत तरी राहू का, याची शाश्वती या कामगारांना राहिलेली नाही. हे मजूर दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहातात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या स्थलांतरित कामगारांना शक्य होत नाही. त्यामुळे नियम पाळत नसल्याबद्दल त्यांना कधीकधी पोलिसांकडून होणारा लाठीमारही सहन करावा लागतो.
अशाच कामगारांपैकी एक असलेले सरोज हे आपली तीन मुले व पत्नीसह शाहदरा औद्योगिक वसाहतीच्या जवळ एका घरात राहातात. तांब्याला पॉलिश करण्याच्या कारख्यान्यात ते काम करायचे. दरमहा १० हजार रुपये उत्पन्न असूनही त्यातही ते नीट भागवायचे. मात्र लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्यांची कमाई थांबलेली आहे. सरोज मूळचे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मूळ गावी जायला मिळेपर्यंत शाहदरामध्ये कसेबसे तगून राहायचे आहे इतकेच त्यांनी सध्या ठरविले आहे.