Coronavirus, Lockdown News: ईशान्य भारतात आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध हटविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 04:03 IST2020-05-04T04:02:51+5:302020-05-04T04:03:03+5:30
नागरिकांना मोठा दिलासा : विशेष पासची आवश्यकता नाही

Coronavirus, Lockdown News: ईशान्य भारतात आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध हटविले
गुवाहाटी : गुवाहाटी : ईशान्य भारतातील आंतरराज्य प्रवासावर लॉकडाऊनच्या काळात घातलेले निर्बंध रविवारपासून हटविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात अशा प्रवासासाठी आता विशेष पास काढण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या साथीपासून ईशान्य
भारतातील सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये झाली आहेत, अशी घोषणा ईशान्य भारत विकास खात्याचे राज्यमंत्री
जितेंद्र सिंह यांनी २७ एप्रिल रोजी केली होती.
आसाममध्ये या विषाणूचे ४२ रुग्ण आढळून आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंतबिश्व सरमा यांनी सांगितले की, ईशान्य भारतातील इतर राज्यांतून आसाममध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांची ‘कोविड-१९’ लक्षणविषयक चाचणी करण्यात येईल. आसामने सिक्कीम वगळता इतर राज्यांना लागून असलेल्या आपल्या सीमा आंतरराज्यीय प्रवासासाठी रविवारपासून खुल्या केल्या आहेत. मात्र ज्यांना इतर राज्यांतून आपल्या खासगी वाहनाने आसाममध्ये यायचे असेल त्यांनी आपल्या प्रवासाचा दिवस व वेळ याचा तपशील आसाम सरकारला आधी कळविला पाहिजे.
विमानांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
लॉकडाऊनच्या काळामध्ये ईशान्य भारतातील राज्यांतील जनतेचे हाल होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने विशेष दक्षता घेतली आहे. या राज्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विशेष विमानांद्वारे करण्यात येत आहे. ३० मार्चपासून एअर इंडिया, भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी ही मालवाहतूक करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील सर्व राज्ये, जम्मू-काश्मीर, लडाख, अंदमान-निकोबार बेटे अशा ठिकाणी विशेष विमानांतून जीवनावश्यकवस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते.