CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता नर्सने दिले कोरोना लसीचे तब्बल 61 हजार डोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:25 IST2021-09-29T15:13:18+5:302021-09-29T15:25:53+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : एका नर्सने गेल्या आठ महिन्यांत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तिने कोरोना लसीचे 61 हजार डोसेस दिले आहेत.

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता नर्सने दिले कोरोना लसीचे तब्बल 61 हजार डोस
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. तसेच या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं देखील गमावली आहेत. कोरोनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तरीही न डगमगता, मागे न हटता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आपलं काम करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
भोपाळमधील एका नर्सने गेल्या आठ महिन्यांत एकही सुट्टी न घेता काम केलं आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तिने कोरोना लसीचे 61 हजार डोसेस दिले आहेत. गायत्री श्रीवास्तव (Gayatri Srivastava) असं या महिला आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव आहे. आपल्या कामाप्रति असलेलं त्यांचं समर्पण पाहून मध्य प्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी गायत्री यांचं भरभरून कौतुक केलं आहे. भोपाळच्या रहिवासी असलेल्या गायत्री सध्या काटजू रुग्णालयात सहायक परिचारिका म्हणून सेवा देत आहेत. जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून त्या या कामात व्यस्त आहेत.
"एक लाख नागरिकांना लस देण्याचा संकल्प"
गायत्री यांनी 25 जानेवारीपासून आतापर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या आठ महिन्यांच्या काळात त्यांनी तब्बल 61 हजारांहून अधिक डोसेस दिले आहेत. एक लाख नागरिकांना लस देण्याचा आपला संकल्प असल्याचं गायत्री यांनी सांगितलं आहे. राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी गायत्री यांच्यासारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळेच मध्य प्रदेश कोरोना लसीकरणाचे नवनवीन विक्रम दररोज प्रस्थापित करत आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मंत्री सारंग यांनी काटजू रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांना गायत्री श्रीवास्तव यांच्याबद्दल माहिती मिळाली.
एकही सुट्टी न घेता आतापर्यंत लशीचे 64 हजार डोस दिले
विश्वास सारंग यांनी गायत्री यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं खूप कौतुक केलं आणि त्यांचा सत्कारदेखील केला. मध्य प्रदेशातल्या छतरपूर रुग्णालयात कार्यरत असलेल्या एएनएम माया अहिरवार (Maya Ahirwar) यांनी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एकही सुट्टी न घेता आतापर्यंत लशीचे 64 हजार डोस दिले आहेत. माया अहिरवार यांच्यासोबतच आता मध्य प्रदेशातल्याच गायत्री श्रीवास्तव यांचंही नाव जोडलं गेलं आहे. मध्य प्रदेशातल्या या दोन्ही परिचारिकांच्या नावांची जोरदार चर्चा सध्या सुरू असून त्यांचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.